पुणे : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाही; मग फाड पावती! | पुढारी

पुणे : हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाही; मग फाड पावती!

पुणे; पुढारी वृत्तसेवा : 1 एप्रिल 2021 नंतर प्रत्येक वाहनाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र वाहन चालकांनी या नंबर प्लेट काढून दुसऱ्या नंबर प्लेट बसवल्या आहेत, अशा वाहनांवर पुणे आरटीओ कडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असून आत्तापर्यंत 127 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.

नव्या गाड्यांना जर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसतील, तर आरटीओकडून गाड्यांवर ऑन द स्पॉट 1 हजार रूपये दंड करण्यात येत आहे. गेल्या दोन दिवसांतच पुणे आरटीओने 127 वाहनांवर ही कारवाई केली असून, यात दुचाकी, चारचाकी आणि गुडस वाहनांचा समावेश आहे.

पुण्यात वाहनाला होणार 1 हजार दंड…
1 एप्रिल 2021 नंतरच्या वाहनांना शासनाने हायसिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक केली आहे, जर वाहनाला ही नंबर प्लेट नसेल तर संबंधित वाहनचालकाला 1 हजार रूपये दंड भरावा लागणार आहे.

हाय सिक्युरिटी क्रमांकासाठी इतका खर्च येणार…
हाय सिक्युरिटी नंबर प्लेट संदर्भातील कारवाई करण्याचे आदेश पुणे आरटीओला मिळाले आहेत. त्यामुळे पुणेकरांना आपल्या गाड्यांच्या बदललेल्या नंबर प्लेट पुन्हा बदलाव्या लागणार आहेत. दुचाकी वाहनाला हायसिक्युरिटी नंबर प्लेट बसवावी लागणार आहे. ही नंबर प्लेट बसवायची असेल तर 356 रूपये तर चारचाकी वाहनांना 600 ते 1100 रूपयांपर्यंत खर्च येणार आहे.

1 एप्रिल 2021 नंतर खरेदी केलेल्या प्रत्येक वाहनाला ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ बंधनकारक आहे. मात्र गाडीची हाय सिक्युरिटी नंबर प्लेट काढून दुसरी बसवलेल्या वाहनचालकांनी तात्काळ वाहनवितरकांशी संपर्क करून ही नंबर प्लेट पुन्हा आपल्या वाहनाला बसवून घ्यावी. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट काढून नवीन नंबर प्लेट बसवणाऱ्या वाहनचालकांवर कडक कारवाई करण्यात येत आहे.

                                 – डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

Back to top button