पुणे : डॉक्टरांच्या नियुक्त्यांची बनवाबनवी; वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पाठिंब्याने सावळागोंधळ | पुढारी

पुणे : डॉक्टरांच्या नियुक्त्यांची बनवाबनवी; वरिष्ठ अधिकार्‍यांच्या पाठिंब्याने सावळागोंधळ

सुषमा नेहरकर-शिंदे

पुणे : ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र सध्या केवळ वरिष्ठ अधिकार्‍यांशी लागेबंधे असलेल्या डॉक्टर, त्यांची पोरंबाळं, नातेवाइकांच्या सोयीच्या कागदोपत्री नियुक्त्यांची केंद्रे बनली आहेत. यामुळेच खेड तालुक्यात डेहणे, वाडा आणि कडूस येथील ग्रामीण, दुर्गम भागातील लोकांच्या आरोग्याचा खेळखंडोबा सुरू आहे. या तीनही प्राथमिक आरोग्य केंद्रांत आवश्यक डॉक्टरांची पदे केवळ कागदोपत्रीच भरलेली दाखविण्यात आली आहेत.

प्रत्यक्ष संबंधित डॉक्टर दुसरीकडेच काम करत आहेत, काही डॉक्टर पाच-सहा महिन्यांपासून कोणतीही पूर्वकल्पना न देता गायब आहेत, तर एका ठिकाणी वरिष्ठ अधिकार्‍याच्या मुलीची केवळ कागदोपत्रीच नियुक्ती दाखविण्यात आली आहे. यामुळे या तिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रांत डॉक्टरांची पदे भरलेली दिसत असली, तरी प्रत्यक्ष डॉक्टर मात्र कामावर हजर नाही. याचे गंभीर परिणाम सध्या ग्रामीण भागातील गरीब, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर होत आहे.

खेड तालुक्यातील ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील गरीब, सर्वसामान्य लोकांच्या आरोग्यावर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या बोगस कारभाराचा प्रचंड वाईट परिणाम होत आहे. एका महिला डॉक्टरांची मूळ नियुक्ती खेड तालुक्यातील वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना आपल्या सोयीसाठी त्या पुण्यानजीक खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करत आहेत.

परंतु, मूळ नियुक्ती वाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात असताना या महिला डॉक्टर कधीही येथे हजर राहात नाहीत, कागदोपत्री डॉक्टराचे पद भरलेले असल्याने नवीन पद देता येत नाही. यामुळे सध्या केवळ एक डॉक्टरच वाडा प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार पाहात आहेत. संबंधित डॉक्टर सुटी, बैठकासाठी गेल्यास येथील लोकांची आरोग्य सेवा वा-यावर सोडली जाते.

खेड तालुक्यातील पश्चिम व आदिवासी पट्ट्यातील दुर्गम खेडेगावांतील आजारी पडलेल्या लोकांसाठी केवळ डेहणे हे प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आधार असतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून येथील आरोग्य विभागाचे तीनतेरा वाजले आहेत. कारण, पुणे महापालिकेचे तत्कालीन आरोग्यप्रमुख व सध्या राज्य शासनाच्या आरोग्य विभागात उपसंचालकांच्या मुलीला एमबीबीएस डॉक्टर म्हणून डेहणे येथे कागदोपत्रीच नियुक्ती देण्यात आली.

ही मुलगी नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कधीही येथे आली नाही, कागदोपत्रीच काम केल्याचे दाखविण्यात आले आणि पोस्ट ग्रॅज्युएटसाठी सरकारी कोट्यातून निवड झाल्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच कागदोपत्रीच राजीनामा देऊन डेहणे प्राथमिक आरोग्य केंद्रात कधीही हजर न राहताच या मुलीने कागदोपत्रीच कार्यकाळ पूर्ण केला.

तर कडूस प्राथमिक आरोग्य केंद्रातील दोन्ही एमबीबीएस डॉक्टर गेले पाच-सहा महिन्यांपासून गायब आहेत. या दोन्ही डॉक्टरांनी राजीनामा दिल्याचे अथवा दुस-या एखाद्या प्राथमिक आरोग्य केंद्र काम करत असल्याची कोणतीही माहिती, पत्रव्यवहार पंचायत समितीशी केलेला नाही. यामुळे सध्या कडूस प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार तिसरेच डॉक्टर प्रतिनियुक्तीवर करत आहेत. एकूणच सध्या खेड तालुक्यातील दुर्गम, आदिवासी भागांतील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्र वरिष्ठ अधिका-यांच्या पाठिंब्याने डॉक्टरांच्या नियुक्त्यांची बनवाबनवी करण्याची केंद्र बनली आहेत.

Back to top button