राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण; किमान तापमानात वाढ | पुढारी

राज्याच्या काही भागांत ढगाळ वातावरण; किमान तापमानात वाढ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतातील हिमालयीन भागात पश्चिमी चक्रवाताचे रूपांतर चक्रीयस्थितीत झाले आहे. त्यामुळे उत्तर भारतातील बहुसंख्य राज्यासह हिमालयीन भागात 25 जानेवारीपर्यंत हिमवर्षाव, तसेच हलका ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असून, बहुतांश भागात ढगाळ वातावरण, तसेच सकाळी धुके पडणार आहे. उर्वरित भागात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवारी नाशिक शहर, जिल्ह्याचा किमान तापमानाचा पारा राज्यात सर्वांत कमी म्हणजेच 11 अंश सेल्सिअस नोंदला गेला आहे.

अफगाणिस्थान भागाकडून येणार्‍या पश्चिमी चक्रावाताचे रूपांतर चक्रीय स्थितीमध्ये झाले आहे. त्याचप्रमाणे वायव्य राजस्थान आणि आसपासच्या भागांत चक्रीय स्थिती तयार झाली आहे. याबरोबरच पश्चिमी चक्रावाताचे रूपांत बाष्पात झाले आहे. हे बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रापासून ते ईशान्य भारतातील राज्याकडे वाहत आहेत. या सर्व परिणामामुळे 24 ते 26 जानेवारीदरम्यान जम्मू-काश्मीर, लडाख, गिलगिट, मुझ्झदराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, या भागांत हिमवर्षाव, उत्तराखंड, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

तर, 27 जानेवारीदरम्यान पुन्हा नवीन पश्चिमी चक्रावात हिमालयीन भागात धडकणार आहे. या सर्व नैसर्गिक स्थितीमुळे राज्याकडे थंड वारे वाहण्याचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे राज्यातील किमान तापमानात सरासरीपेक्षा थोडी वाढ झाली आहे. त्यामुळे पुढील चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार आहे. तर, उर्वरित भागात हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Back to top button