लोणी-धामणी : श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानचा गाभारा झळाळला | पुढारी

लोणी-धामणी : श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थानचा गाभारा झळाळला

लोणी-धामणी(ता. आंबेगाव); पुढारी वृत्तसेवा : धामणी येथील कुलस्वामी श्री म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिराला दोन भाविकांनी उच्च दर्जाच्या सागवानी लाकडाचे व त्यावर जर्मन सिल्व्हर पत्र्याचे नक्षीदार आवरण घातलेले दोन दरवाजे कुलस्वामी खंडोबाला अर्पण केले. त्यामुळे मंदिराला नवी झळाळी आल्याचे ग्रामस्थ व सेवेकरी भगत, तांबे, वाघे, वीर मंडळींनी सांगितले. मुख्य मंदिराच्या आतील गाभार्‍यातील मोठा सागवानी दरवाजा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पर्यावरण विषयाच्या मार्गदर्शक अभ्यास मंडळाचे सल्लागार सदस्य व ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. विलास जी. वायकर (पणजी, गोवा) यांनी, तर दुसरा सागवानी दरवाजा धामणी (ता. आंबेगाव) येथील दशरथ भीमाजी बोर्‍हाडे आणि भोसरी येथील बोर्‍हाडे हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रशांत दशरथ बोर्‍हाडे यांनी अर्पण केल्याचे खंडोबा देवस्थानचे मुख्य पुजारी दादाभाऊ भगत, सुभाष तांबे, प्रभाकर भगत यांनी सांगितले.

या दोन्ही सुबक कलाकुसरीचे सागवानी दरवाजे भिलारेवाडी (कात्रज, पुणे) येथील प्रख्यात कारागीर राजू मिस्त्री आणि त्यांच्या सहकार्‍यांनी तयार केलेले आहेत. मिस्त्री बंधू हे आळंदी व देहू येथील माऊली व तुकाराम महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यातील रथाचे व पालखी तयार करण्याचे व दरवर्षी पॉलिश करण्याचे काम सेवाभावे करीत आलेले आहेत.

धामणीच्या खंडोबा मंदिरातील म्हाळसाकांताच्या मूर्तीभोवतालची प्रभावळ व सिंहासन तसेच देवाची सागवानी पालखी तयार करण्याचे व त्यावरील जर्मन सिल्व्हरचे सुरेख नक्षीकाम मिस्त्री बंधू यांनी 20 वर्षांपूर्वी केलेले असून, त्यांनी या वेळी प्रभावळीला व सिंहासनाला संपूर्ण पॉलिश विनामूल्य करून दिल्याचे प्रकाश जाधव पाटील व ग्रामस्थांनी सांगितले.

Back to top button