पिंपरी : निगडी परिसरात वीजपुरवठा पुन्हा खंडित | पुढारी

पिंपरी : निगडी परिसरात वीजपुरवठा पुन्हा खंडित

पिंपरी : यमुनानगर, निगडी गावठाण, साईनाथनगर आदी परिसरात शुक्रवारी (दि. 20) पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला. दोनच दिवसांपूर्वी या परिसरात काही तासांसाठी वीजपुरवठा विसकळीत झाला होता. त्यानंतर आज पुन्हा ही समस्या उद्भवल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महावितरणची भूमिगत वीजवाहिनी तुटल्याने निगडी गावठाण, यमुनानगर आणि साईनाथनगर परिसरात बुधवारी (दि. 18) वीज पुरवठा विस्कळीत झाला होता. जवळपास चार तास हा वीजपुरवठा खंडित झाला होता. निगडी गावठाण येथील 4 ट्रान्सफार्मर बंद असल्याने त्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु होते.

त्यामुळे तेथील वीजपुरवठा मात्र जास्त काळ खंडित राहिला. पर्यायाने, नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला होता. त्यानंतर आज पुन्हा खंडित पुरवठ्याची समस्या निर्माण झाली. यमुनानगर, निगडी गावठाण, साईनाथनगर परिसरात दुपारी साडेचारच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला होता. सायंकाळी सहा ते सव्वासहाच्या दरम्यान साईनाथनगर, निगडी गावठाण या भागाचा वीजपुरवठा पूर्ववत सुरु झाला. मात्र, यमुनानगर येथील काही भागाचा वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत खंडित होता. महावितरणच्या अधिकार्‍यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, चाकण एचडी केबलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने यमुनानगर परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता.

Back to top button