पुणे ग्रामीण पोलिसांत बेल्जियम मलिनोईस जातीचे श्वान | पुढारी

पुणे ग्रामीण पोलिसांत बेल्जियम मलिनोईस जातीचे श्वान

चाकण; पुढारी वृत्तसेवा : बॉम्बशोधक व नाशक पथक पुणे ग्रामीण येथे पहिल्यांदा बेल्जियम मलिनोईस जातीचे अत्यंत चाणाक्ष श्वान वीरा ही पोलिस दलामध्ये सुमारे वर्षभरापूर्वी दाखल झाली आहे. वेगवेगळ्या आर्टिकलचे प्रशिक्षण श्वान वीराला देण्यात आले असल्याची माहिती श्वान वीराचे हस्तक गणेश फापाळे यांनी दिली आहे. दि. 2 मार्च 2022 रोजी पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलिस निरीक्षक नलावडे यांच्या देखरेखीखाली श्वानाचे 2 महिन्यांचे पिल्लू खरेदी करण्यात आले.

या नवीन श्वानाचे नाव ‘वीरा’ ठेवण्यात आले. श्वान वीरा हिचे प्रथम हस्तक म्हणून पोलिस हवालदार गणेश फापाळे व दुय्यम हस्तक पोलिस नाईक गोरखनाथ भामगर यांची निवड करण्यात आली. वीरा ही सहा महिन्यांची झाल्यानंतर तिला श्वान प्रशिक्षण केंद्र शिवाजीनगर (सीआयडी) येथे स्फोटके ओळखण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले.

त्यानंतर तिला वेगवेगळ्या आर्टिकलचे प्रशिक्षण देण्यात आले. सोमवारी (दि. 16) सहा महिने पूर्ण झाल्याने श्वान वीरा हिची अंतिम परीक्षा घेण्यात आली. त्यामध्ये श्वान वीरा हिने वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये बॉम्बचे आर्टिकल शोधले. त्यामध्ये तिला ‘अ’ ग्रेड मिळाला. श्वान वीराच्या चांगल्या कामगिरीमुळे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अंकित गोयल, बॉम्बशोधक-नाशक पथकाचे पोलिस निरीक्षक नलावडे यांनी श्वान वीरा व पोलिस हवालदार गणेश फापाळे तसेच पोलिस नाईक गोरखनाथ भामगर यांचे विशेष कौतुक केले.

Back to top button