पाबळचे ग्रामीण रुग्णालय बंदच! रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी | पुढारी

पाबळचे ग्रामीण रुग्णालय बंदच! रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी

शिक्रापूर (ता. शिरूर); पुढारी वृत्तसेवा : पाबळ येथे ग्रामीण रुग्णालय असून, त्या ठिकाणी कोरोना काळात तब्बल तीस ऑक्सिजन बेड उभारले होते. परंतु, केवळ डॉक्टर व कर्मचार्‍यांअभावी ग्रामीण रुग्णालय बंद आहे. हे रुग्णालय तातडीने सुरू करण्याची मागणी बाळासाहेबांची शिवसेना शिरूर-आंबेगाव महिला संघटिका अ‍ॅड. रेश्मा चौधरी यांनी केली आहे. पाबळ येथे गेल्या चार वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयाची इमारत तयार आहे. कोरोना काळामध्ये येथे ऑक्सिजन बेड सुरू करण्यात आले.

मात्र, त्यानंतर कर्मचारी नसल्याने सदर ग्रामीण रुग्णालय बंद झाले. संपूर्ण इमारत तसेच रुग्णालयातील सुविधा धूळखात पडल्या आहेत. ग्रामीण रुग्णालयासाठी असलेली नवीन रुग्णवाहिकादेखील वापराविना उभी आहे. पाबळच्या आजूबाजूला वाड्यावस्त्या आहेत. तेथील नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे कठीण झाले आहे. सदर रुग्णालय सुरू झाल्यास परिसरातील चाळीस हजारांहून अधिक नागरिकांना लाभ होणार आहे. सदर रुग्णालयात कर्मचार्‍यांची नेमणूक करून तातडीने सुरू करण्याची मागणी अ‍ॅड. चौधरी यांनी केली आहे.

रुग्णालय सुरू करण्याचे प्रयत्न
पाबळ ग्रामीण रुग्णालयात कर्मचार्‍यांची संख्या कमी आहे. नव्याने कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात येत आहे. कर्मचार्‍यांची नेमणूक तसेच सदर ठिकाणी अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करून लवकरात लवकर रुग्णालय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वृषाली राऊत यांनी सांगितले.

Back to top button