पुणे-नाशिक रेल्वेची फाईलच हलेना; तीन महिन्यांनंतरही फाईल जागेवरच | पुढारी

पुणे-नाशिक रेल्वेची फाईलच हलेना; तीन महिन्यांनंतरही फाईल जागेवरच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यासह नगर आणि नाशिक जिल्ह्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेला पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचे भवितव्य सध्यातरी अधांतरीच दिसत आहे. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या हरकतीनंतर प्रकल्प आहे तसाच पुढे चालू ठेवणे अथवा रेल्वे मंत्रालयाच्या मागणीनुसार बदल करून पुन्हा नव्याने डीपीआर सादर करणे असे कोणतेही काम गेल्या 3 महिन्यांत झालेले नाही. गेल्या 3 महिन्यांपासून प्रकल्पाची फाईल दिल्लीत रेल्वे मंत्रालयात धूळ खात पडून आहे. अनेक वर्षांपासून सातबार्‍यावर भूसंपादनाचे शिक्के पडलेले शेतकरी मात्र अडचणीत सापडले आहेत. आमच्या जमिनींचे संपादन तरी करा अथवा सातबार्‍यावरील शेरे कमी करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या पंधरा वर्षांपासून कागदावर असलेल्या पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्गाने गेल्या एक-दीड वर्षांत चांगली गती घेतली होती. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत, रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड, निती आयोग आणि वित्त मंत्रालय सर्वांनी परवानगीदेखील दिली. यासाठी आवश्यक असलेल्या सर्व तांत्रिक मान्यतादेखील मिळाल्या. यामुळेच राज्य शासनाने आपल्या हिश्श्याचे 20 टक्के निधी देऊ केल्याने भूसंपादन प्रक्रिया सुरू होऊन 867 हेक्टरपैकी 150 हेक्टर जागा ताब्यातदेखील घेण्यात आली.

आता केवळ रेल्वे मंत्रालयाकडून पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाच्या डीपीआर सीसीईए कमिटीसमोर ठेवून मंजुरी घेणे बाकी असताना रेल्वे मंत्रालयाने प्रकल्पावर काही आक्षेप घेतले आहेत. सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग जमिनीवरून असल्याने जनावरे, प्राणी आडवे येऊन अपघात होऊ शकतात, पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाऐवजी ‘रेल्वे कम रोड’ चा विचार करा, अशा सूचना केल्या आहेत.

पुणे जिल्ह्यासाठीच नाही, तर नगर आणि नाशिक या तीन जिल्ह्यांच्या विकासासाठी पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी आम्ही संबंधित सर्व खासदार संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यापूर्वी एकत्र बसून यावर चर्चा करणार आहोत. यासाठी दबाव गट तयार करून योग्य पद्धतीने मार्ग काढण्याची गरज आहे. हा रेल्वे मार्ग होणे किती आवश्यक आहे हे वारंवार सांगत आलोच आहे. आता कोणत्याही परिस्थितीत प्रकल्पाचे काम मार्गी लावणे, प्रकल्प पुन्हा एकदा रुळावर आला पाहिजे यासाठी मी प्रयत्नशील आहे.

                                  डॉ. अमोल कोल्हे, खासदार, शिरूर लोकसभा मतदार संघ.

Back to top button