पिंपरी : महापालिका आता थकबाकीदारांच्या सदनिका करणार जप्त | पुढारी

पिंपरी : महापालिका आता थकबाकीदारांच्या सदनिका करणार जप्त

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातील मिळकतकर थकबाकी असलेल्या मिळकतधारकांवर जप्ती व वसुलीची कारवाई मोहीम सुरू आहे. निवासी मिळकतधारकांकडे तब्बल 480 कोटी रुपयांचा थकीत कर आहे. आता, थकबाकीदारांच्या सदनिका जप्त करण्याची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. त्या संदर्भातील पत्रे शहरातील विविध 100 हाउसिंग सोसाट्यांना पाठविण्यात आली आहेत, असे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी मंगळवारी (दि.17) सांगितले.

पालिकेकडे शहरातील 5 लाख 92 हजार मिळकतींची नोंद आहे. गेल्या वर्षी मिळकतकरातून एकूण 625 कोटींची वसुली झाली होती. यंदा आतापर्यंत 600 कोटींची वसुली झाली आहे. 31 मार्च 2023 पर्यंत तब्बल 1 हजार कोटींची वसुली करण्याचे करसंकलन विभागासमोर टार्गेट आहे.

शहरात हाउसिंग सोसायट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. काही मोठ्या सोसायट्यांमध्ये एक हजार ते दीड हजार सदनिकाधारकांकडे थकबाकी आहे. त्यामुळे संपूर्ण सोसायटीचे नळजोड तोडणे जरी कायद्याने योग्य असले तरी, पालिका प्रशासन अशी कारवाई करणार नाही. मात्र, सोसायटीमधील थकबाकीदारांनी मिळकतकर भरावा म्हणून सोसायटीचे अध्यक्ष व सचिवांनी पालिकेला सहकार्य करून संबंधितांना कर भरण्यास सांगावे. थकबाकीदारांची नावे सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावावी. त्यानंतरही थकबाकीदार सदनिकाधारकांनी कर न भरल्यास त्यांचे नळजोड तोडण्यासाठी अध्यक्ष व सचिवांच्या सहमतीने कारवाई करण्यात येईल.

Back to top button