‘डॉ. पतंगराव कदम सोनहिरा’ सर्वोत्कृष्ट; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विविध पुरस्कार जाहीर | पुढारी

‘डॉ. पतंगराव कदम सोनहिरा’ सर्वोत्कृष्ट; वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे विविध पुरस्कार जाहीर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने (व्हीएसआय) आर्थिक वर्ष 2021-22 च्या विविध पुरस्कारांची
घोषणा करण्यात आली आहे. राज्यात मानाचा असलेला ‘कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना’ पुरस्कार सांगली-कडेगाव येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास जाहीर झाला आहे.

याबाबतच्या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी (दि. 13) ’व्हीएसआय’चे उपाध्यक्ष आमदार दिलीप वळसे पाटील, महासंचालक संभाजी कडू पाटील, सल्लागार शिवाजीराव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली. ’व्हीएसआय’च्या मांजरी येथील मुख्यालयात 21 जानेवारी रोजी संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

’व्हीएसआय’चे संचालक व विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. ’कै. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील सर्वोत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन’ पुरस्कार दोन कारखान्यांना विभागून देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर आणि सोलापूरमधील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना या कारखान्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार
गतवर्षी ‘उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापना’चे पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. दक्षिण विभागात सांगली-खानापूर येथील उदगिरी शुगर अँड पॉवर लिमिटेड, मध्य विभागात दौंड शुगर प्रा. लि., उत्तर-पूर्व विभागात कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना जालना-अंबड यांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

उत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार
’व्हीएसआय’चे उत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कारही जाहीर झाले आहेत. दक्षिण विभागात सातारा-कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखाना, मध्य विभागात पुणे-जुन्नर येथील श्री विघ्नहर सहकारी साखर कारखाना, उत्तर-पूर्व विभागात लातूर-निवळी येथील विलास सहकारी साखर कारखान्यास हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

Back to top button