पिंपरी: महापालिकेकडून मिळकतकर थकबाकी वसुली जोरात; मालमत्ता जप्ती, नळजोड खंडितची करणार कारवाई | पुढारी

पिंपरी: महापालिकेकडून मिळकतकर थकबाकी वसुली जोरात; मालमत्ता जप्ती, नळजोड खंडितची करणार कारवाई

पिंपरी (पुणे), पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाने थकीत मिळकतकर वसुलीसाठी कंबर कसली आहे. वारंवार कर भरण्याचे आवाहन करून त्यास प्रतिसाद न देणार्‍या थकबाकीदारांची नावे संबंधित हाउसिंग सोसायटींच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहेत. लाऊड स्पीकरवर थकबाकीदारांची नावे जाहीर केली जाणार आहेत. मिळकत जप्त करण्याची तसेच, नळजोड खंडित करण्याची कारवाई जोरात सुरू आहे.

शहरात 5 लाख 90 हजार निवासी व बिगरनिवासी मिळकतींची नोंद पालिकेकडे आहे. आतापर्यंत 565 कोटी रुपये मिळकतकराचा भरणा झाला आहे. शहरातील 1 लाख 62 हजार निवासी मिळकतधारकांकडून अनधिकृत बांधकाम शास्तीकर वगळून मूळ मिळकतकरांची 480 कोटींची थकबाकी आहे. थकबाकीदार मिळकतधारकांना पालिकेने जप्तीपूर्व नोटीसा बजावल्या आहेत.

नोटिशीनंतर मुदतीमध्ये थकबाकीसह कर न भरल्यास मिळकत जप्तीची कारवाई पोलिस बंदोबस्तात केली जात आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 804 मिळकतीपैकी 406 मिळकती जप्त करून त्यांना सील लावण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2 हजार 398 नागरिकांनी कर जमा केला आहे. तर, तब्बल 2 हजार थकबाकीदारांचे नळजोड खंडित करण्यात आले आहेत.

शहरातील काही हाउसिंग सोसायट्यांमधील सदनिकाधारकांनी अद्याप मिळकतकर भरलेला नाही. अशा थकबाकीदारांची नावे सोसायटीचे अध्यक्ष व सचिव यांच्याशी चर्चा करून सोसायटीच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहेत. तसेच, थकबाकीदारांची नावे लाऊडस्पीकरवर जाहीर करण्यात येणार असून, त्याचे वैयक्तिक नळजोड खंडित केले जाणार आहेत. कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी तात्काळ कर भरावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

वारंवार आवाहन करूनही प्रतिसाद न दिल्याने कारवाई

मिळकतकर थकबाकीदार असलेल्या निवासी व बिगरनिवासी मालमत्ता कायद्यानुसार सील करण्याचा अधिकार महापालिकेस आहे. मात्र, राहत्या घराला सील करता येत नाही. नाईलाजास्तव पाणीपुरवठा बंद करणे, थकबाकीदारांची नावे जाहीर करणे अशी कारवाई केली जात आहे. थकबाकीदारांनी मिळकतकराची बिले भरून पालिकेला सहकार्य करावे, असे कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले.

Back to top button