पिंपरी: निष्काळजीपणा करीत वाहन चालविणे बरे नव्हे! | पुढारी

पिंपरी: निष्काळजीपणा करीत वाहन चालविणे बरे नव्हे!

संतोष महामुनी

नवी सांगवी : बालपणातील सर्व हट्ट आई वडीलच पुरवतात. परंतु असा हट्ट पुरवून जीवानिशी लहानग्यांना खेळवू नका. स्वतःहून अपघाताला बळी पडू नका. इतका निष्काळजीपणा कसा काय करू शकता. एखादा अपघात घडून जीव गेल्यावरच लक्षात येणार आहे का? नवी सांगवी, पिंपळे गुरव परिसरात मुख्य रस्त्यांवरून, गल्ली बोळातून, वर्दळीच्या ठिकाणी दुचाकी वाहन चालक आपल्या लहान मुलांना हट्टापायी दुचाकीवर विरुद्ध दिशेने पाठीला पाठ लावून वाहनावर बसवून वाहन चालविताना अनेकदा पाहवयास मिळत आहे. अशा तर्‍हेने वाहन चालविणे धोकादायक आहे.

अपघात घडून आल्यास जबाबदार कोण?

पिंपळे गुरव, नवी सांगवी परिसरात अनेकदा दुचाकी वाहनचालकांचे मोबाईलवर बोलत असताना, ओव्हर टेक, रस्त्यावर खडी, वाळू पसरल्याने खड्ड्यांमुळे अपघात घडून येत आहेत. एखादा दिवस मुलांच्या हट्टापायी दुचाकी वाहनांवर बसवून पाठीला पाठ लावून मुख्य रस्त्यावरून जात असताना नियंत्रण राखण्यासाठी अचानक ब्रेक दाबल्यास मागील मुलगा जाऊन खाली पडला आणि मागून येणार्‍या वाहनाखाली चिरडून जागीच मृत्यू घडून आल्यास याला जबाबदार कोण? असा प्रश्न भेडसावत आहे. इतका निष्काळजीपणा करीत वाहन चालविणे बरे नव्हे. वेळ कधीही सांगून येत नाही. वाहतुकीचे नियम पाळणे अत्यावश्यक आहे. अशा पद्धतीने वाहन चालविल्यास स्वतःचा जीव वाचवाल परंतु मागे बसलेल्या चिमुकल्याचा क्षणात जीव धोक्यात जायला वेळ लागणार नाही.

आजकाल मुलांच्या हट्टापायी अनेक जण चिमुकल्यांना अशा तर्‍हेने बसवून स्वतःचा आणि त्या चिमुकल्याचाही जीव धोक्यात घालत आहेत. अशांवर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी. अशा निष्काळजीपणामुळे एखादा अपघात घडून आल्यास मागून येणार्‍या वाहनचालकाच्या गाडी खाली चिरडल्यास याला जबाबदार कोण?
– सचिन कदम, पिंपळे गुरव

याला कायद्यात नियम काही नाही. मात्र अपघात घडून एखाद्याचा जीव गेल्यास कायद्याने त्या वाहनचालकावर 304 गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे. खर्‍या अर्थाने अशा तर्‍हेने निष्काळजीपणा करीत वाहन चालविणे चुकीचेच आहे. वाहनचालकांनी वाहन चालविताना वाहतुकीचे नियम पाळूनच वाहन चालविणे गरजेचे आहे.
– सुनील टोनपे, सांगवी वरिष्ठ पोलिस निरीक्षक

Back to top button