पिंपरी : कचऱ्याचे डोंगर हटविण्याचे आव्हान ! | पुढारी

 पिंपरी : कचऱ्याचे डोंगर हटविण्याचे आव्हान !

मिलिंद कांबळे : 

 पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून दररोज 1 हजार 200 टन कचरा मोशी कचरा डेपोत जमा होतो. गेल्या 25 वर्षांपासून जमा होणार्‍या कचर्‍यामुळे डेपोत अक्षरश: कचर्‍याचे डोंगर तयार झाले आहेत. या लाखो टन कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे आव्हान महापालिका प्रशासनासमोर आहे. त्यासाठी बायोमॉयनिंगचा आधार घेण्यात आला असून, कचरा हळूहळू नष्ट केला जात आहे.

मोशी कचरा डेपोत वेगवेगळा प्रकारचा कचरा दररोज आणून टाकला जातो. तेथे अनेक वर्षांपासून जमा झालेल्या कचर्‍याचे काय करायचे ? त्याची विल्हेवाट कशी लावायची ? तसेच, परिसरात उद्भवणार्‍या दुर्गंधीचा त्रास कसा रोखायचा ? वाढत्या शहरासाठी कचरा ही एक नवीन समस्या निर्माण झाली आहे, त्याचे काय करायचे, असे प्रश्न पालिका प्रशासनासमोर निर्माण झाले आहेत. या कचर्‍याची विल्हेवाट लावून डेपोतील जागा रिकामी करण्यासाठी पालिकेचे बायोमॉयनिंगचे काम हाती घेतले आहे.

एकूण 81 पैकी 14 एकर जागेतील आठ लाख क्युबिक मीटर कचरा काढला जाणार आहे. मार्च 2021 पासून 3 लाख क्युबिक कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली आहे. या कचर्‍याचे विलगीकरण केले जाते. प्लास्टिक, पत्रा, लोखंड, स्टिल, खत व इतर असा कचरा वेगवेगळा केला जातो. त्यासाठी त्या ठिकाणी यंत्रसामग्री उभारण्यात आली आहे. जेसीबीद्वारे कचरा यंत्रात टाकून हा कचरा वेगवेगळा केला जातो. भंगार साहित्य आणि निर्माण झालेल्या खताची विक्री केली जाते. कचर्‍यातून मोठ्या प्रमाणात खत निर्माण झाले आहे. ते खत शेती, नर्सरी, उद्यान आदींना विकले जात आहे. त्यामुळे डेपोतील कचर्‍याचे ढीग हळूहळू कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.

आठ लाख क्युबिक लिटर कचर्‍याची विल्हेवाट लावण्यानंतर 14 एकरचा भाग रिकामा होणार आहे. त्या जागेचा वापर पालिकेस करता येणार आहे. हे काम डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. या पहिल्या टप्प्यातील कामासाठी 42 कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
या कामासोबत कचर्‍याचे 15 लाख क्युबिक मीटर कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या कचर्‍याची विल्हेवाट लागल्यानंतर 15 ते 16 एकर जागा रिकामी होणार आहे. या दोन्ही टप्प्यातील सर्व कचरा येत्या दोन ते अडीच वर्षात साफ केला जाणार आहे. त्या जागेत आवश्यकतेनुसार कचर्‍याचे वेगवेगळे प्रकल्प राबविले जाणार आहेत.

दररोज मोशी डेपोत जमा होतो 1,200 टन कचरा

शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराच्या 27 कोटी लोकसंख्येत दररोज 1 हजार 200 टन कचरा जमा होत आहे. त्यात ओला, सुका, हॉटेल वेस्ट, मंडई वेस्ट, ग्रीन वेस्ट, चिकन वेस्ट, औद्योगिक वेस्ट या कचर्‍यांचा समावेश आहे. हा कचरा दररोज मोशी डेपोत नेऊन टाकला जातो. एकूण 81 एकर जागेत डेपो आहे.

3 लाख क्युबिक मीटर कचर्‍याची विल्हेवाट

गेल्या 25 वर्षांपासून मोशी डेपोत कचरा जमा झाला आहे. त्या कचर्‍याची विल्हेवाट न लावल्यास भविष्यातील कचरा टाकण्यास जागा उपलब्ध होणार नाही. त्यासाठी महापालिकेने बायोमॉयनिंगद्वारे कचर्‍याची विल्हेवाट लावण्याचे काम हाती घेतले आहे. संबंधित ठेकेदार एजन्सी तो कचरा वेगवेगळा करून जागा साफ करीत आहे. आतापर्यंत 3 लाख क्युबिक मीटर कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात आली आहे, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी इतर पर्याय :

कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध पर्यायांवर काम केले जात आहे. पाचशे टनचा मॅकेनिकल कंपोस्टींग प्लान्ट सुरू आहे. दररोज पाच टन प्लास्टिक कचर्‍यापासून इंधन तयार करण्याचा प्रकल्प सुरू आहे. तसेच, प्लास्टिक कचर्‍यापासून ब्लॉक तयार करून ते प्लास्टिक साहित्य तयार करणार्‍या कंपन्यांना पुरविले जात आहे. त्यापासून बाके, पेव्हिंग ब्लॉक, कुंड्या आदी साहित्य तयार केले जात आहे. तसेच, सुक्या कचर्‍यापासून वीज निर्मिती प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यापासून 14 मेगावॅट प्रतितास इतकी वीज निर्माण होणार आहे. हॉटेल वेस्टपासून बायोगॅस तयार करण्याचा प्रकल्पाचे काम सुरू आहे. दोनशे टीपीडी क्षमतेच्या प्रकल्पात बांधकाम राडारोड्यावर प्रक्रिया करून पेव्हिंग ब्लॉक, ट्री गार्ड, वाळू तयार केली जात आहे.

Back to top button