…तर अराजकता माजली असती; ‘अशोक पर्व’ महोत्सवात राज ठाकरे यांचे परखड मत | पुढारी

...तर अराजकता माजली असती; ‘अशोक पर्व’ महोत्सवात राज ठाकरे यांचे परखड मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आपण जेवढ्या प्रतिमा जपल्या तेवढ्या प्रतिभा जपल्या नाहीत. परदेशांत गेल्याशिवाय आपल्याला आपल्या कलाकारांचे महत्त्व उमगत नाही. आज अशोक सराफ जर युरोपातील कलाकार असते तर, त्यांचा सत्कार तिथल्या पंतप्रधानांच्या हस्तेच झाला असता. परदेशात कलाकारांच्या नावाने मोठमोठ्या वास्तू उभ्या राहतात, विमानतळ होतात आणि आपल्याकडे साधे चौक असतात. ही सारी कलाकार मंडळी आहेत म्हणून अन्यथा आपल्या देशात अराजकता माजली असती, असे परखड मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.

रावेतकर ग्रुप व अभिव्यक्ती संस्थेच्या वतीने ’अशोक पर्व’ या महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी राज ठाकरे यांच्या हस्ते आणि रसिक प्रेक्षकांच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी ठाकरे बोलत होते. अशोक सराफ यांच्या नाट्य व चित्रपटसृष्टीतील कारकीर्दीला यंदा 50 वर्षे व त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य साधत त्यांचा अभिनय क्षेत्रातील प्रवास उलगडणार्‍या या ’अशोक पर्व’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. रविवारी सन्मान सोहळ्याच्या अगोदर अभिनेते प्रशांत दामले यांनी अशोक सराफ यांची मुलाखत घेतली. या वेळी अशोक सराफ यांच्या पत्नी अभिनेत्री निवेदिता सराफ, रावेतकर समूहाचे संचालक अमोल रावेतकर उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेश दामले यांनी केले.

ठाकरे म्हणाले, ‘अशोक सराफ हे एकमेव असे अभिनेते आहेत, ज्यांना प्रेक्षक म्हणून समोर कोणीही असलं तरी फरक पडत नाही. त्यांचा स्वत:चा नाटकावर एक वेगळा ’इम्पॅक्ट’ असतो. हा प्रभाव गेली 50-60 वर्षे कायम असून, ही बाब साधीसुधी नाही. केवळ विनोदी कलाकार म्हणून त्यांच्यावर शिक्का मारणे चुकीचे आहे कारण चित्रपटात आज झालेल्या विनोदावर प्रेक्षक त्यानंतर दीड- दोन वर्षांनी हसत असतो, हे लक्षात घेण्यासारखे आहे.’ हा दागिना सराफांच्या घरीच मिळू शकतो, अशी मिश्कील टिप्पणी देखील ठाकरे यांनी केली.

अशोक सराफ दक्षिणेत असते तर आज मुख्यमंत्री असते, इतकेच नाही तर त्यांचा 40- 40 फुटांचा कटआऊट लावून त्याचा दुग्धाभिषेक केला गेला असता. आपल्याकडे हा फक्त चांगला कलाकार आहे, यावर भागवलं जातं असेही ठाकरे यांनी नमूद केले. सराफ यांचा जन्म बेळगावचा असल्याने आता तुम्हीच सीमाप्रश्न सोडवा, अशी विनंती मिश्कीलपणे ठाकरे यांनी त्यांना केली. तर मोठ्या माणसांचे सत्कार करायला आता तेवढीच मोठी माणसं राहिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

जे काम येत गेलं, ते मी प्रामाणिकपणे करत गेलो. ते लोकांना आवडले ही माझ्या दृष्टीने मोठी गोष्ट आहे आणि म्हणूनच रसिक प्रेक्षकांचे हे ऋण माझ्यावर आहेत, असे मी मानतो. आज माझा हा सन्मान राज ठाकरे यांच्या हस्ते झाला याचाही मला आनंद आहे.

                                                  अशोक सराफ, ज्येष्ठ अभिनेते

Back to top button