शिरूर : धाक दाखवून कुटुंबाला लुटले | पुढारी

शिरूर : धाक दाखवून कुटुंबाला लुटले

शिरूर; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नगर रस्त्यावर न्हावरा फाट्याच्या पुढे शिरूरजवळ टायर पंक्चर झाल्याने थांबलेल्या कारचालकास व कुटुंबास कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याजवळील सोने, डायमंड दागिन्यांसह रोख 10 हजार रुपये, असा तीन लाख दहा हजारांचा ऐवज दुचाकीवर आलेल्या तीन चोरट्यांनी बळजबरीने चोरून नेला. यासंदर्भात धन्यकुमार मदनलाल बरमेचा (वय 52, रा. केडगाव, ता. जि. अहमदनगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिरूर पोलिस ठाण्यात तीन अनोळखी चोरट्यांविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शिरूर पोलिसांनी दिलेली माहितीनुसार, फिर्यादी हे कुटुंबासह मुंबई येथे गेले होते. तेथून काम आटोपून 3 जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजता पुन्हा घरी अहमदनगर येथे निघाले असता पुणे-नगर रस्त्यावर न्हावरा फाट्याच्या पुढे शिरूरजवळ नमो फर्निचर येथे मध्यरात्री त्यांची गाडी पंक्चर झाली.

त्यामुळे ते स्टेपणी बदलण्यासाठी थांबले असता दुचाकीवर आलेल्या 25 ते 30 वर्षे वयोगटाच्या कोयता गँगच्या अज्ञात तीन अनोळखी चोरट्यांनी ’येथे का थांबला?’ अशी विचारणा करीत कोयत्याचा धाक दाखवून बरोबर असलेल्या कुटुंबाच्या (महिलांसह) अंगावरील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणिमंगळसूत्र, मंगळसूत्राचे पॅडल, डायमंड असलेल्या दोन सोन्याच्या अंगठ्या, सोन्याच्या दोन चेन, डायमंडची अंगठी, रोख दहा हजार रुपये, असा एकूण 3 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने पळविला. शिरूरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील या घटनेचा तपास करीत आहेत.

Back to top button