लोणी काळभोर : तलाठी कार्यालयातील बेकायदा नेमणुकांच्या चौकशीचे आदेश | पुढारी

लोणी काळभोर : तलाठी कार्यालयातील बेकायदा नेमणुकांच्या चौकशीचे आदेश

लोणी काळभोर (ता. हवेली ); पुढारी वृत्तसेवा : गावपातळीवरील तलाठी कार्यालयात खासगी कर्मचार्‍यांच्या बेकायदा नेमणुका असतील तर त्याची चौकशी करण्यात येईल. संबंधितावर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. हवेलीच्या तहसीलदारांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. कोलवडी येथील अभिलेख दस्त खाडाखोडप्रकरणी अहवाल मागवण्यात आला आहे, अशी माहिती हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी संजय आसवले यांनी दिली.

हवेली तालुक्यातील महसूल विभागात गावपातळीवरील तलाठी कार्यालयात अनधिकृत नेमलेल्या खासगी कर्मचार्‍यांनी सात-बारावर खाडाखोड केल्याबाबत दै.’पुढारी’मध्ये (दि.30 डिसेंबर) ’सातबारामध्ये चक्क खाडाखोड ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाले आहे. या बातमीची दखल हवेलीचे उपविभागीय महसूल अधिकारी संजय आसवले यांनी घेत तत्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत.
हवेली तालुक्यात गावपातळीवरील तलाठी कार्यालयात खासगी कर्मचार्‍यांच्या बेकायदा नेमणुका अनेक वर्षांपासून आहेत.

सात-बारावरील खाडाखोड माहिती तलाठ्यापेक्षा या खासगी कर्मचार्‍यांना असते, त्यामुळे त्यांना कार्यालयातून बेदखल करणे तलाठ्यांना परवडत नाही. तलाठ्यांना फायदेशीर असलेले खासगी कर्मचारी मात्र शेतकर्‍यांना अडचणीत आणणारे ठरले आहेत. अनेक शेतकर्‍यांना या खासगी कर्मचार्‍यांच्या चुकीच्या कामाचा फटका वर्षानुवर्षे बसत आहे. शेतकर्‍यांचे दस्त नोंदणीसाठी कार्यालयात येता क्षणी त्या दस्तावर हरकती येतात, ही माहितीसुद्धा हेच खासगी कर्मचारी देत असल्याने याचा मनस्ताप शेतकर्‍यांच्या माथी पडतो.

अनेक शासकीय लफडी हे खासगी कर्मचारीच करत असल्याने हवेली तालुक्यात शेतकरी पुरता वैतागला आहे. यांचा मुळापासून बंदोबस्त व्हावा अशी मागणी हवेली तालुक्यात होऊ लागली आहे. उपविभागीय महसूल अधिकारी संजय आसवले यांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेतली असल्याने हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे काय कारवाई करतात, याकडे हवेली तालुक्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले आहे.

तालुका कार्यालयातही उच्छाद
हवेली तालुक्यात गावपातळीवरील तलाठी कार्यालयातच खासगी कर्मचार्‍यांचाउच्छाद आहे, असे नाही तर शेतकर्‍यांना त्रास देणार्‍या यंत्रणेचा तालुकापातळीवरील महसूल कार्यालयातही हस्तक्षेप आहे, खुलेआम शासकीय अभिलेख संबंधित खासगी कर्मचार्‍यांसमोर हाताळला जातो, हे उघड्या डोळ्याने पाहूनही महसूल प्रमुख म्हणून जबाबदारी असणारे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत, यामुळे शासकीय अभिलेख कार्यालयातून गायब होण्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत व सध्याही कोणाचेही नियंत्रण नसल्याचे सिद्ध झाले आहे, याबाबतची माहिती उपविभागीय अधिकारी संजय आसवले यांना आहे, त्यांनीही या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.

Back to top button