पळसदेव : उजनी धरणावर हिमालयातील ग्रिफनचा विहार; धरणनिर्मितीनंतर यंदा प्रथमच आगमन | पुढारी

पळसदेव : उजनी धरणावर हिमालयातील ग्रिफनचा विहार; धरणनिर्मितीनंतर यंदा प्रथमच आगमन

प्रवीण नगरे

पळसदेव : निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखली जाणारी हिमालयातील ग्रिफन प्रजातीची गिधाडे स्थलांतर करून उजनी धरणावर दाखल झाली आहेत. स्थानिक पक्ष्यांबरोबर स्थलांतरित पाहुण्यांसाठी नंदनवन ठरलेल्या उजनी परिसरात विहार करणार्‍या पक्ष्यांच्या वैभवात या गिधाडांमुळे भर पडली आहे. जिप्स फल्विस ( Gyps fulvis) अशा शास्त्रीय नावाने आणि पांढरे व मोठे गिधाड तसेच मराठीतील ग्रिफन गिधाड नावाने परिचित असलेल्या या गिधाडांनी मागच्या आठवड्यात उजनी पाणलोटक्षेत्रात जोडीने विहार करताना स्थानिक पक्षिनिरीक्षकांना प्रथमच दर्शन दिले आहे. पाकिस्तान, नेपाळ, उत्तर भारतातील पहाडी परिसर व हिमालय पर्वतरांगेत वास्तव्याला असणारी ही गिधाडे हिवाळी पाहुणे म्हणून भारताच्या दख्खन भागातील महाराष्ट्र, गुजरात व मध्य प्रदेश या राज्यांत तीन ते चार महिने वास्तव्याला येतात. यातील नर व मादी दिसायला सारखेच असतात.

अन्नसाखळीत महत्त्वाची भूमिका
नैसर्गिक अन्नसाखळीत गिधाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. भारतात गिधाडांच्या नऊ प्रजाती आढळतात. मात्र यातील बर्‍याच प्रजातींची संख्या मागील काही दशकांत अचानकपणे कमी झाल्याची बाब गंभीर आहे. दोन वर्षांपूर्वी उजनी परिसरात युरोशियन गिधाडांनी आपले अस्तित्व दाखविले होते. त्यानंतर ग्रिफन गिधाडे या ठिकाणी आल्यामुळे उजनी पक्षिवैभवात भर पडली आहे.

गिधाडांची वैशिष्ट्ये
ग्रिफन गिधाड सर्वांत मोठ्या आकाराचे असून, तपकिरी रंगाची पिसे असलेल्या या गिधाडाच्या मानेवर पिसे नसतात. डोक्यावर पिवळट पांढरी केसांसारखी बारीक पिसे असतात. पोटाखालचा भाग गुलाबी व उदी रंगाचा असतो व त्यावर पिवळसर पट्टे असतात.

एकेकाळी गावोगावी बहुसंख्येने नजरेस पडणार्‍या गिधाडांची संख्या मानवी अतिक्रमणामुळे प्रचंड वेगाने रोडावली आहे. नव्वदच्या दशकात जिल्ह्यातून गायब झालेली गिधाडे अधूनमधून आपले अस्तित्व दाखवत आहेत. गिधाडांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना पोषक वातावरण निर्माण केले पाहिजे.
                                                                    डॉ. अरविंद कुंभार,
                                                           ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक

Back to top button