शिरूर लोकसभेत वाढतेय बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद | पुढारी

शिरूर लोकसभेत वाढतेय बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद

सुषमा नेहरकर-शिंदे

राजगुरुनगर : गेल्या सहा-सात महिन्यांत शिरूर लोकसभा मतदारसंघातील जुन्नर तालुक्यातील बिबट सफारी असो, की शिरूर तालुक्यातील वढू-तुळापूर येथील धर्मवीर संभाजी महाराज यांचे अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक आणि आता खेड पंचायत समितीच्या इमारतीला तब्बल 14 कोटींचा निधी देत विविध प्रलंबित प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने मार्गी लावले आहेत. यामुळेच सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढताना दिसत असून, येत्या काही दिवसांत अनेक उद्धव ठाकरेसमर्थक शिंदे गटात दाखल होणार असल्याची चर्चा मतदारसंघात रंगत आहे.

राज्यात सत्तांतर होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले. सत्तेच्या या महानाट्यात शिवसेनेचे विभाजन होऊन शिंदे गट बाहेर पडला, तर काही लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. राज्यातील सत्तांतरानंतर मात्र मतदारसंघातील बहुतेक सर्व प्रमुख नेते व कार्यकर्त्यांचा मोठा गट शिंदे गटात सामील झाला.

शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा पारंपरिक विरोधक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाहिले जाते. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मात्र पुणे जिल्ह्यात प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची प्रचंड वाताहत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाणीवपूर्वक शिवसेनेचे स्थानिक नेते, कार्यकर्त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. खेड तालुक्यातील पंचायत समिती सभापतिपदाच्या निवडणुकीनंतर खरेतर महाआघाडी सरकारमध्ये पहिली ठिणगी पडल्याचे बोलले जाते.

सत्तेत असताना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी आपलेच पारंपरिक विरोधक राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळवून घेण्याचे सल्ले दिले. यामुळेच शिरूर लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील मतदारसंघातील मोठा गट शिंदे गटामध्ये सामील झाला.

राज्यात सत्ता आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील जाणीवपूर्वक आपल्या गटात सहभागी झालेल्या नेते व कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम केले. शिवसेनेचे दिवंगत माजी आमदार सुरेश गोरे यांनी मंजूर केलेल्या खेड पंचायत समितीच्या इमारतीच्या कामाला शिवसेनेचाच मुख्यमंत्री असलेल्या महाआघाडी सरकारने स्थगिती दिली. याबाबत गोरे कुटुंबीयांसह शिवसेनेच्या नेत्यांनी आपल्या आमदारांनी भूमिपूजन केलेल्या जागेतच ही इमारत पूर्ण करून खर्‍या अर्थाने गोरे यांना श्रद्धांजली देऊ, अशी मागणी केली.

परंतु, राष्ट्रवादी काँग्रेससमोर मुख्यमंत्र्यांचे काहीच चालले नाही आणि या बांधकामाला स्थगिती देण्यात आली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिरूर मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात तीन-चार बैठका घेऊन बहुतेक सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. यात गोरे यांच्या जयंतीनिमित्त खेड पंचायत समितीच्या गोरे यांनी निश्चित केलेल्या व भूमिपूजन केलेल्याच जागेत नव्याने बांधकाम करण्यास मंजुरी देत तब्बल 14 कोटींचा निधी मंजूर करीत अनोखी श्रद्धांजली दिली. यामुळेच गेल्या काही महिन्यांत शिरूर लोकसभा मतदारसंघात बाळासाहेबांच्या शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे.

Back to top button