‘अवैध रिक्षा चालकांवर कारवाई करा, वैध रिक्षाचालकांवर नको’ | पुढारी

'अवैध रिक्षा चालकांवर कारवाई करा, वैध रिक्षाचालकांवर नको'

पुणे ; पुढारी वृत्तसेवा: अवैध रिक्षा चालकांवर कारवाई करा, वैध रिक्षाचालकांवर नको, अशी मागणी करत पुणे आरटीओ कार्यालयावर रिक्षाचालकांनी बुधवारी धडक मोर्चा काढला. अवैध रिक्षा चालकांवर कारवाई करताना प्रशानाने वैध आणि अवैध यातील फरक जाणून कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली.

पुणे स्टेशन येथे अल्‍पवयीन मुलीवर झालेल्‍या अत्‍याचाराप्रकरणानंतर प्रशासनाकडून रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र या कारवाईत अवैद्य रिक्षा चालकांसह वैध रिक्षा चालकांवर देखील कारवाई होत आहे. त्यामुळे रिक्षा चालकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

रिक्षा पंचायतीकडून या मोर्चाचे आयोजन

रिक्षा पंचायतीकडून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संघटनेचे सरचिटणीस नितीन पवार व अन्य रिक्षाचालक उपस्थित होते. यावेळी रिक्षाचालकांनी कारवाई करताना पोलिसांनी आणि आरटीओ प्रशासनाने वैध आणि अवैध यातील फरक जाणून कारवाई करावी, अशी मागणी रिक्षाचालकांनी केली.

याबाबतचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांना देण्यात आले. तसेच, पुणे स्टेशन येथे अल्‍पवयीन मुलीवर झालेल्‍या अत्याचाराबाबत उपस्थित रिक्षाचालकांनी माफी मागितली. तर रिक्षा पंचायतीकडून या मुलीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले.

हेही वाचलं का ? 

Back to top button