पुढारी ऑनलाईन डेस्क : 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे जाणून शिक्षण हाच जनजागृतीचा आणि सर्वांगीण विकासक्रांतीचा पाया आहे, हे ओळखून कर्मवीर भाऊराव पाटील (Karmveer bhaurao patil) यांनी निरपेक्ष भावनेने शिक्षण क्षेत्रात काम केले. या कामाला भारताच्याच नव्हे तर जगाच्या इतिहासातही तोड नाही. संकुचित स्वार्थावर पाणी सोडून व्यापक हिताची भावना समाजात आली तरच समाजसुधारणा होते.
महात्मा गांधी भाऊराव पाटील (Karmveer bhaurao patil) यांच्या कामाने भारावून गेले आणि त्यांनी रयतच्या जडणघडणीसाठी हरिजन सेवक संघातून दर वर्षी या होस्टेलसाठी ५०० रुपये देऊ केले. हा किस्सा स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे संजय खोत यांनी फेसबुकवर लिहला आहे.
भाऊराव पाटील म्हटलं की एक विशाल वटवृक्ष परंतु मानवी मनाच्या सवयीप्रमाणे आपण आताच्या परिस्थितीत गदगद होऊन थोड्या काळात ते विसरून जात आहोत. एक माणूस जो घरी अपमानीत होऊन बाहेर पडला त्यानं सामाजिक अपमानात खितपत पडलेल्या बहुजन लोकांना त्या काळातील सर्वात शक्तीशाली हत्यार दिलं ते म्हणजे शिक्षण.
भाऊरावांच्या या उतुंग कार्यात अनेक अडथळे तर आलेच पण चांगल्या कामाला मदत करणाऱ्या लोकांची कमी पडत नसे.१९१९ साली सातारा जिल्ह्यातील कराड येथील काले गावात अण्णांनी त्यांची पहिली शाळा सुरू केली. दोनच वर्षात त्यांना मुंबईला गांधींना ऐकण्याचा योग आला. तेथून त्यांनी गांधींच्या विचारांचा जो पगडा घेतला तो कायमचा. अण्णांनी त्यांनतर खादी देखील आयुष्यभर अवलंबली.
शिक्षण क्षेत्रात आता अण्णांचं काम भरीव आहे. इकडे गांधी त्यांच्या भारत स्वातंत्र्य संग्रामात होते. पण त्यांचंही स्वप्न होतच की शिक्षणाची बाजू बळकट व्हावी. आफ्रिकेत असताना त्यांनी टॉलस्टॉय फार्म आणि भारतात सेवाग्राममध्ये नई तालीम नावाच्या अनोख्या शिक्षणपद्धती अवलंबल्या होत्या. हरिजन सेवक संघ नावाने त्यांनी जातीयव्यवस्था संपवण्याणसाठी काम सुरू केले होते आणि भारतभर जे लोक यासाठी काम करतायेत त्यांची दखलही ते घेत असत.
१९२४ पासून भाऊरावांनी साताऱ्यात अस्पृश्य मुलांची होस्टेल काढली, शिक्षण सुरू केलं, त्याचबरोबरच कमवा शिकामधून एक उत्तम माणूस घडवला जाऊ लागला. या कामाने गांधींना भाऊरावांची मेहनत, हेतू सर्व आवडलं. नंतर गांधींनी हरिजन सेवक संघातून दर वर्षी या होस्टेलसाठी ५०० रुपये देऊ केले. त्यानंतर साताऱ्यात भेट देऊन कर्मवीरांनी केलेलं काम हे मी सेवाग्राममध्ये देखील करू शकलो नाही अशी स्तुती केली.
भाऊराव ही त्यांचे पाईक होते. गांधींच्या नावाच्या शाळा, हॉस्टेल उभे करून भाऊरावांनी त्यांना मानवंदना आधीच दिली होती. जवळपास १०१ अशी हॉस्टेल, शाळा गांधींच्या नावे उभी केली. हे सगळे प्रसंग the Bountiful Baniyan : Biography Of Karmveer Bhaurao Patil या पुस्तकात आपल्याला पाहायला मिळतील याचे लेखक पी. जी. पाटील आहेत. इतर अनेक ठिकाणी, पुस्तकात, वेबसाइटवरती ही माहिती मिळू शकते.