मुंबईच्या गर्लफ्रेंडचा कोल्हापुरात धिंगाणा, शोले स्टाइल भूमिकेने जिल्ह्यात चर्चा | पुढारी

मुंबईच्या गर्लफ्रेंडचा कोल्हापुरात धिंगाणा, शोले स्टाइल भूमिकेने जिल्ह्यात चर्चा

कोल्हापूर; पुढारी ऑनलाईन : कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टण कोडोली (Pattan Kodoli) गावात एक तरुण मुंबईच्या तरुणीसोबत सोशल मीडीयावर बोलत होता. यातून त्यांच्या मैत्रीचे रुपांतर नात्यात झाले. दोघेजण कित्येक वेळा भेटले. एकमेकांच्या घरीही गेले आणि अचानक मुलगा तिच्याशी बोलायचा बंद झाला. मुलगीची बैचेनी वाढली.

ती थेट मुलाच्या घरी आईसोबत आली आणि मुलाच्या घरच्यांची भंबेरी उडाली. मुलीने लग्न करण्याचा हट्ट धरला पण मुलाच्या घरच्यांनी नाकारले. यातून मुलगीने गावातील खणीत उडी घेण्याचा पवित्रा घेतला. या धिंगाण्याची चर्चा जिल्ह्यात रंगली. तरुणीने शोले स्टाइल भूमिका घेतल्याने पट्टण कोडोली (Pattan Kodoli) गावात ही चर्चा चवीने चघळली जात होती.

सोशल मीडियावरून झालेल्या प्रेमसंबंधातून मुंबई येथील एका तरुणीने पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील प्रियकाराच्या घरी जावून लग्न करण्याचा अट्टा धरला. यावेळी प्रियकर व त्याच्या नातेवाईकांनी तिच्या मागणीला न जुमानता तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या तरुणीने येथील गावखणीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र उपस्थित ग्रामस्थांनी तिला अडवून समजूत काढून मुंबईला परत पाठविले. याप्रकरणाची गावातील चौकाचौकात चर्चा रंगली आहे.

मुंबई, नालासोपारा ते पट्टण कोडोली एका क्षणात संपर्क…

मुंबई येथील नालासोपारा परिसरात राहणार्‍या एका वीस वर्षीय तरुणीची पट्टणकोडोली येथील एका तरुणाबरोबर सोशल मीडियावरून मैत्री निर्माण झाली. यातून पुढे मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. दोघांनी संसार थाटण्याच्या उद्देशाने आणाभाकाही घेतल्या. प्रेमातील गुलाबी अनुभवही घेतले. प्रियकर मुंबई येथे या तरुणीच्या घरी जावून राहूनही आला होता. तर तरुणीही काही महिन्यांपूर्वी पट्टण कोडोली येथील प्रियकराच्या घरी राहून गेली होती.

मात्र, काही दिवसांपासून प्रियकराने तिच्याशी संपर्कच टाळल्याने तरुणीने आज सकाळी आपल्या आईसोबत थेट प्रियकराचे घरच गाठले. या तरुणीला पाहताच प्रियकाराचे आणि त्याच्या नातेवाईकांचे चांगलेच धाबे दणाणले होते. तरुणीने घरातच ठिय्या मांडत लग्न करण्याची मागणी प्रियकराकडे केली.

मात्र प्रियकर व त्याच्या नातेवाईकांनी लग्नास नकार दिल्याने या तरुणीने येथील गावखणीत उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी येथील उपस्थित ग्रामस्थांनी तिला अडवून पुन्हा प्रिकराबरोबर चर्चेस बसविले. तरीही प्रिकराने लग्नास नकार दिला. तरुणीने मात्र खूप आटापिटा केला.

प्रियकराच्या मनाला पाझर न फूटताच तो लग्न न करण्याच्या मागणीवरच ठाम राहिला. ग्रामस्थांनी या तरुणीची व तिच्या आईची समजूत काढून तिला पुन्हा मुंबईस परत पाठविले. हा प्रकार जवळजवळ चार तास चालू होता. हे पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.

याबाबत हुपरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले याप्रकरणी हुपरी स्थानकात कोणतीही तक्रार झाली नसल्याचे सांगण्यात आले. रात्री ९ प्रर्यंत आम्ही जनतेच्या सेवेसाठी असतो परंतु अशी तक्रार करण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

Back to top button