नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : Nitin Gadkari : देशात विमान व्यवसायामध्ये ज्या प्रमाणे पायलटच्या विमान उड्डाणाचे तास निश्चित असतात, त्याचप्रमाणे ट्रकचालकांचे देखील ड्रायव्हिंगचे तास निश्चित करण्याचे निर्देश केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत.
नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीतून गडकरींनी हे आदेश दिले. त्यासंदर्भात सर्व राज्य सरकारे, जिल्हाधिका-यांना देखील निर्देश दिले जातील, असेही गडकरींनी स्पष्ट केले.
देशातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा रस्ते समितीच्या नियमित बैठका होतील याची काळजी घेण्याच्या सूचना करणारे पत्र सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकार्यांना पाठवणार असल्याचे देखील गडकरींनी यानिमित्त सांगितले.
मालवाहू ट्रकचालक लांब पल्ल्याचे प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहून नेत असतात. त्यामुळे या प्रवासादरम्यान त्यांना डुलकी लागण्याची देखील शक्यता असते.
अशाच काही प्रकरणात मोठे अपघात झाल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच ट्रकचालकांना डुलकी लागू नये, यासाठी देशातील सर्व व्यावसायिक वापराच्या ट्रकमध्ये 'ऑन बोर्ड स्लिप डिटेक्शन सेंन्सर्स' बसवण्याच्या युरोपियन देशांमधील मानकांसम धोरणावर काम करण्याचे निर्देश गडकरींनी दिले आहे.
या यंत्रणेमुळे ट्रक चालकाला डुलकी लागल्यास तात्काळ वाजणारे सेन्सर्स बसवले जातील. अशा प्रकारांचे प्रमाण त्यामुळे कमी होऊ शकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, रस्ते अपघातात होणा-या मृत्यूंची संख्या मोठ्या प्रमाणावर कमी व्हायला हवी हे स्पष्ट करतानाच नितीन गडकरींनी या बैठकीमध्ये रस्ते सुरक्षा गटाच्या सदस्यांना यासंदर्भात लवकराच लवकर धोरण तयार करण्याचे निर्देश दिले आहेत.
देशभरात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर होणारे रस्ते अपघात हा प्रशासनासाठी मोठा चिंतेचा विषय आहे. या अपघातांमध्ये जीवितहानी होत असल्यामुळे त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक झाले आहे.
रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी नितीन गडकरींनीच राष्ट्रीय रस्ते सुरक्षा गटाची स्थापना केली आहे. तसेच, दर दोन महिन्यांनी या गटाची बैठक होते आणि त्यात संभाव्य योजनांवर चर्चा होते.