डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : प्रदूषणामुळे वालधुनी नदीची परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यातच भराव टाकल्यामुळे वालधुनी नदी पात्र आकसत चालले आहे. शिवाय मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे आसपासच्या रहिवाशी भागात पुराचे पाणी घुसून जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे, अशी तक्रार वालधुनी स्वच्छ्ता समितीचे पदाधिकारी विनोद शिरवाडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागाने संबंधित कंपनीला नोटीस बजावली आहे.
कल्याण पश्चिमेकडे असलेल्या वालधुनी नदीच्या किनारी मे. सेंचुरी रेयॉन यांची जागा आहे.
काही वर्षांपूर्वी मोठमोठे डंपर कित्येक वर्षे भरणी टाकत होते.
त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातील रहिवाश्यांना हा काय प्रकार आहे, याची माहिती मिळाली नाही.
हा भराव थेट वालधुनी नदीच्या पात्रात येऊन पोहोचला होता.
त्या भरावावर वनीकरण करण्यात आले.
त्यानंतर काही वर्षांनी तेथे बिर्ला इस्टेट विकासकाच्या नावाने इमारती बांधण्यास सुरुवात झाली.
विनोद शिरवाडकर यांनी तक्रारीत म्हटले होते की, नदी पात्रात भराव टाकल्यामुळे आजूबाजूच्या परिसरात वालधुनी नदीचा पावसाळी येणाऱ्या पुराची तीव्रता वाढली आहे.
२००५, २०१९ आणि आता २०२१ सालात आलेल्या महापुरास सेंचुरी रेयॉनने वालधुनीत टाकलेली भरणी देखील कारणीभूत ठरली आहे.
कारण हे पाणी रहिवासी भागात घुसण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही.
सेंचुरी रेयॉनची जागा मूळ स्थितित असताना हे पाणी तेथे पसरत असल्यामुळे या भागात फक्त जुन्या भवानी नगर विभागात पूर येत होता.
त्यामुळे पुराची तीव्रता नगण्य होती. आता हा पूर योगीधाम त्रिमूर्ती कॉलनी, अनुपम नगर, घोलप नगर आणि आसपासच्या परिसरात येऊ लागला आहे, असेही शिरवाडकर यांनी शासन, प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
नदीतील हा अतिरिक्त भराव काढून टाकण्यात यावा. तसेच भविष्यात नदी पात्रात कोणतीही अनधिकृत भिंत नदी पात्रात बांधू नये. तसेच याची सखोल चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करून हा नदी पात्रातील भराव पूर्णपणे काढून, विकासकाला दिलेल्या परवानगीचा पुनर्विचार करण्यात यावा, अशी मागणी ही वालधुनी स्वच्छ्ता समितीचे पदाधिकारी विनोद शिरवाडकर यांनी केली होती.
या संदर्भात शिरवाडकर यांनी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, कल्याणचे तहसीलदार, पोलिस दलाचे २७ ऑगस्ट २०१९ रोजी एका पत्राद्वारे लक्ष वेधले होते.
या तक्रारीला अनुसरून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी चौकशीचे आदेश दिले.
केडीएमसीने १५ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार आणि विनोद शिरवाडकर यांच्या तक्रारीला अनुसरून मेसर्स सेंचुरी रेयॉनच्या नावे सीईओ के. टी. जिथेंद्रन (बिर्ला इस्टेट), तसेच वास्तूशिल्पकार शोभना देशपांडे यांच्या नावे नोटीस बजावली आहे.
नोटीस बजावल्यापासून एक आठवड्यात कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागाचे सहाय्यक संचालकांच्या कार्यालयात खुलासा करावा, असे आदेश पारित केले आहेत.
नदीपात्रात भराव टाकून त्यावर वनीकरण केले आहे.
नदी पात्रात केलेल्या भरावावर भविष्यात पक्की भिंत बांधण्याच्या इराद्याने तारेचे कुंपण घातले आहे.
बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र कडोंमपा/नरवि/बांप/ कवि/२०१८-१९/३५ प्रमाणे २९ ऑक्टोबर २०१२ अन्वये बांधकाम प्रारंभ प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले असून त्यातील सर्व अटी/शर्ती आपणांवर बंधनकारक आहेत.
प्रस्तुत प्रकरणी हे पत्र मिळताच नगररचना विभागाचे सहाय्यक संचालकांच्या कार्यालयात ७ दिवसांच्या लेखी खुलासा सादर करावा.
अन्यथा आपल्याला काही म्हणावयाचे नाही, असे समजून पुढील कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असेही या नोटिसीमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
आता या नोटिशीला सदर कंपनी काय उत्तर देते आणि केडीएमसी प्रशासन काय कार्यवाही करते,
याकडे वालधुनी स्वच्छ्ता समितीच्या नजरा लागल्या आहेत.
हेही वाचलं का ?