former mp raju shetti : ‘राजू शेट्टींनी साखर कारखान्याबरोबर सेटलमेंट केली’ | पुढारी

former mp raju shetti : 'राजू शेट्टींनी साखर कारखान्याबरोबर सेटलमेंट केली'

जयसिंगपूर ; पुढारी वृत्तसेवा : थकित रक्कम मुदतीपेक्षा जादावेळ थकल्यास त्याला १५ टक्के जादा व्याजदर देण्याची तरतुद आहे. ही व्याजाची रक्कम कोट्यवधी रूपये थकीत असताना स्वाभिमानीचे राजू शेट्टी (former mp raju shetti), सावकर मादनाईक, सचिन शिंदे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी साखर कारखान्याला व्याज नको म्हणून करार पत्रे दिली आहेत. त्यामुळे स्वाभिमानीने शेतकर्‍यांवर बोलू नये, म्हणजेच राजू शेट्टी यांनी साखर कारखान्यांबरोबर सेटलमेंट केली असल्याचा आरोप आंदोलन अंकुशचे धानाजी चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत केला.

चुडमुंगे पुढे म्हणाले, एकरकमी एफआरपी मिळावी. तसेच १५ टक्के व्याजाची लढाई आंदोलन अंकुशने जिंकली आहे. मात्र गेल्या दहा वर्षापासून राजू शेट्टी (former mp raju shetti) शेतकर्‍यासाठी आंदोलन करीत नाहीत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात १०० कोटी रूपये व्याजाची रक्कम थकित आहे.

शेट्टी हे कारखानदारांना फितूर झाले

शिवाय २ जुलै २०२१ रोजी शेट्टी यांनी दिलेल्या मुलाखतीत व्याजाची रक्कम घेतल्याशिवाय गप्प बसणार नसल्याचे सांगितले होते. आणि ८ जुलै २०२१ रोजी शेट्टी व त्यांचे सहकारी सावकर मादनाईक, आण्णासो पाटील, सचिन शिंदे, प्रकाश गावडे यांनी साखर कारखान्याला १५ टक्के व्याजदर नको म्हणून करारपत्रे लिहून दिले आहेत. त्यामुळे शेट्टी हे कारखानदारांना फितूर झाले आहेत.

शेतकर्‍यांना एकरकमी एफआरपी मिळाली पाहिजे असे बाहेरून म्हणायचे आणि आतून कारखानदारांना सामिल व्हायचा प्रकार हा घातक आहे. स्वाभिमानीच्या या धोरणामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

शिवाय शेट्टी हे कारखानदारांना फितूर झाल्याने एकरकमी एफआरपीला धक्का बसला आहे. त्यामुळे कारखानदार मनाला येईल तशी बिले. देवू लागल्यास शेतकरी अडचणीत सापडेल.

त्यामुळे आंदोलन अंकुश हे पाहून गप्प बसणार नाही. शेतकर्‍यांच्या प्रश्नावर लढा देणारच असल्याचे चुडमुंगे यांनी सांगितले.

यावेळी उदय होगले, आप्पासो कदम, बंडू होगले, अमोल गावडे, दत्त जगदाळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Back to top button