पुणे : ‘मिक्स अँड मॅच’ लसीमुळे संसर्गापासून बचाव | पुढारी

पुणे : ‘मिक्स अँड मॅच’ लसीमुळे संसर्गापासून बचाव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सध्या शासकीय लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्ड लस उपलब्ध नाहीत. शासनाने बुस्टर डोससाठी कोव्हॅक्सिन, कॉर्बेव्हॅक्स वापरता येईल, याबाबतच्या सूचना आधीच दिल्या आहेत. ’मिक्स अँड मॅच’ लस घेतली तरी ’अँटीबॉडीज्’ विकसित होऊन प्रतिकारशक्ती तयार होते. त्यामुळे नागरिकांनी संभ्रमित न राहता उपलब्ध लसीचा तिसरा डोस घ्यायला काहीच हरकत नाही, याकडे डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे.

बुस्टर डोसबाबत नागरिकांमध्ये बराच संभ्रम पहायला मिळत आहे. दुसरा डोस घेऊन वर्ष उलटून गेल्यास बुस्टर डोसचा उपयोग होतो का, बुस्टर डोस घेऊन सहा महिन्यांहून अधिक काळ उलटून गेला असल्यास काय होईल, असे अनेक प्रश्न नागरिकांकडून विचारले जात आहेत. त्यामुळे बुस्टर डोस घेतलेल्यांचे प्रमाण 70-80 टक्क्यांपर्यंत जाणे आवश्यक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी
अधोरेखित केले आहे.

चीनसह काही देशांमध्ये
कोरोनाने पुन्हा रुद्रावतार धारण केला आहे. भारतात धोका टाळण्यासाठी मास्कच्या वापरासह बुस्टर डोसवर भर देण्यास सांगण्यात आले आहे. यावर्षी कोरोना आटोक्यात आल्याने लसीकरणाचे प्रमाण खूपच कमी झाले. देशात बुस्टर डोस घेणार्यांची संख्या 10 टक्क्यांहून कमी आहे. हे प्रमाण वाढण्याच्या दृष्टीने लसीकरणाचे आवाहन करण्यात आले आहे.

दुसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण 80-90 टक्के असले तरी तिसरा डोस घेतलेल्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. हे प्रमाण 70 ते 80 टक्के झाले पाहिजे. बूस्टर डोसनंतर अँटीबॉडी बराच काळ टिकतात आणि अँटीबॉडीचे प्रमाण कमी झाले, तरी प्रतिकारशक्तीचे स्मरण ‘टी’ पेशींमध्ये कायम राहते. त्यामुळे पुन्हा संसर्ग झाला तरी दवाखान्यातील भरती, आजारातील गुंतागुंत यापासून बचाव होतो. अमेरिकेतील आणि युरोपमधील अभ्यासानुसार, चौथ्या डोसचा उपयोग सहव्याधी, ज्येष्ठ नागरिक यामध्ये दिसून आला आहे. भारतात सध्या तरी चौथा डोस विचाराधीन आहे.
                                        – डॉ. अमित द्रविड, विषाणूजन्य आजारांचे तज्ज्ञ.

कोरोनाप्रतिबंधक लसीचा बुस्टर डोस घेतल्यानंतर तयार होणा र्‍या अँटीबॉडी वर्षभराहून अधिक काळ टिकतात. दुसरा डोस घेऊन सहा महिने उलटल्यावर बुस्टर डोस मिळतो. मात्र, त्याहून अधिक काळ उलटून गेल्यास लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. आधीचे दोन डोस कोव्हिशिल्डचे घेतले असतील तरी तिसरा डोस कोव्हॅक्सिनचा किंवा इतर लसीचा घेता येऊ शकतो.
                                              – डॉ. अनिकेत देशपांडे, जनरल फिजिशियन.

Back to top button