बना बहुआयामी! मल्टिस्किल्स असण्याचे ‘हे’ आहेत फायदे | पुढारी

बना बहुआयामी! मल्टिस्किल्स असण्याचे 'हे' आहेत फायदे

कीर्ती कदम

एकाच विषयातील पदवी घेऊन त्याच क्षेत्रात करिअर करण्याचे दिवस आता सरले आहेत. कारण, वर्तमान काळात कुठल्याही व्यवसायामध्ये प्रत्येक वेळी कंपनीसाठी तयार राहणार्‍या मल्टिस्किल्स व्यक्तींची मागणी वाढत आहे. काही वर्षांपूर्वी कुठल्याही एका विषयातील पदवी घेतल्यानंतर त्याच क्षेत्रात काम केले तरीही चालत होते. इतर कौशल्यांची फारशी आवश्यकता भासत नव्हती. परंतु, आता बदलत्या काळामध्ये एकाच व्यक्तीमध्ये इतरही कौशल्ये असणे काळाची गरज बनली आहे.

कोणीही सर्वगुणसंपन्न असू शकत नाही. हे खरे असले तरीही इतर विषयातील थोड्याशा क्षमता असल्या, तर जॉब प्रोफाईल नक्कीच उत्तम बनू शकते. थोडक्यात, आजच्या घडीला बहुआयामी व्यक्तिमत्त्व असणे गरजेचे बनले आहे. प्रत्येक क्षेत्रातील थोडीशी माहिती असली, तर ती व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये इतर व्यक्तींपेक्षा नक्कीच वेगळी दिसू शकते आणि ग्रुपमधून वेगळे कौशल्य असणार्‍या व्यक्तींची बढती वेगाने होते हेही दिसत आहे. वेगवेगळ्या कंपन्या आणि कॉर्पोरेट क्षेत्रात एक नजर टाकली, तर अशा मल्टिस्किल्स व्यक्तीच अधिक यशस्वी होत आहेत हे सहजपणे दिसेल.

काही व्यक्तींसाठी अशा पद्धतीने बहुगुणी बनणे त्रासदायक ठरू शकते, तर काहींसाठी अशी गुणवत्ता असणेदेखील त्रास देणारे ठरू शकते; पण तरीही यशाची पायरी चढायची असेल, तर मूळ विषयातील ज्ञानाव्यतिरिक्त विषयाशी निगडित इतर गोष्टींचेही ज्ञान असणे आवश्यक असते. अनेकदा वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणार्‍या लोकांना बर्‍याच ताण देणार्‍या वातावरणातून जावे लागते. काही वेळा जॉब प्रोफाईल आपल्या क्षमतेनुसार नसल्यामुळे ताण येतो; पण ज्या व्यक्तींकडे मल्टिस्किल्स असतात अशा व्यक्ती या परिस्थितीतही स्वतःला सिद्ध करू शकतात.

मोठमोठ्या कंपन्यांबरोबरच लहान कंपन्यांमध्येदेखील आज कर्मचार्‍यांना तणावमुक्त ठेवण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवले जातात. म्हणूनच कंपन्यांमध्ये ‘ह्युमन रिसोर्स’ अर्थात मानवी संसाधन विभागाचे महत्त्वदेखील वाढले आहे. हा विभाग कर्मचार्‍यांच्या मानसिकतेच्या द़ृष्टीने महत्त्वाची भूमिका निभावत असतो. कुठल्याही कार्यालयात उत्तम वातावरण असेल, तर कंपनीची प्रगतीदेखील उत्तम प्रकारे होऊ शकते. कुठल्याही कंपनीसाठी मल्टिस्किल्स व्यक्तींचे बरेच फायदे असतात. म्हणजेच एखादी व्यक्ती कंपनीमध्ये मार्केटिंग क्षेत्रासोबतच दुसरे कामदेखील करत असेल, तर त्या व्यक्तीचे जॉब प्रोफाईल आपोआपच उत्तम बनते.

वेगवेगळ्या क्षेत्रातील भिन्न भिन्न ज्ञान व्यक्तीला दुसर्‍यांपेक्षा नक्कीच पुढे घेऊन जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे मल्टिस्किल्स असण्याचे फायदे जास्त आहेत आणि नुकसान कमी. यातील नुकसान फक्त एकच असते, ते म्हणजे यामुळे व्यक्ती सॉफ्ट टार्गेट बनू शकते. काम आपल्या मनानुसार नसते तेव्हा कुठल्याही कंपनीत आपल्यावर दबाव येऊ शकतो. अशा स्थितीत योग्य निर्णय घेऊन स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मानसोपचारतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, अशा स्थितीत व्यक्तीला वैचारिक द़ृष्टीने तंदुरुस्त असणे गरजेचे असते. त्यासाठी आपले काम अर्थात जॉब आवडीचा पाहिजे. यामुळे मन प्रसन्न राहते. व्यक्ती बहुकुशल असेल, तर चिंता कमी होते आणि प्रगती वाढत जाते. एखाद्या व्यावसायिक पदवीसोबतच इतर कौशल्येदेखील आत्मसात करत राहिल्यास भविष्यात प्रगतीचे अधिक मार्ग खुले होतात, हे मात्र नक्की.

Back to top button