पिंपरी : स्मार्ट सिटीकडून गळती काढण्याचे काम सुरू | पुढारी

पिंपरी : स्मार्ट सिटीकडून गळती काढण्याचे काम सुरू

नवी सांगवी : पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील नवी सांगवी, पिंपळे गुरव येथील पवना नदी दिवसेंदिवस दूषित होत चालली आहे. वरील आशयाची बातमी दैनिक पुढारीत ‘ड्रेनेजलाईनचे पाणी थेट पवना नदीत’ या शीर्षकाद्वारे गुरुवारी (दि. 22) प्रसिद्ध झाली होती. या बातमीची त्वरित दखल घेत संबंधित प्रशासनाने शुक्रवारपासून काम सुरू केले. येथील शिवराम नगरमधील हाजी हजरत सय्यद गैयबी पीर दर्ग्याच्या मागील बाजूस गेली काही महिने तीन ते चार ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन फुटल्याने तसेच चेंबर गळतीमुळे पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मैला तसेच सांडपाणी वाहून पवना नदी दूषित होत चालली आहे. या वेळी शिवराम नगर येथील नदीपात्रालगत असलेल्या ड्रेनेजलाईनपर्यंत पोहचण्यासाठी गेली दोन दिवस मुरूम टाकून रस्ता करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्त्या करण्यात येत होता.

महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत येथील नदी पात्रालगत असलेली झाडे झुडपे काढून टाकण्यात येत होते. तसेच मोठ्या प्रमाणात साचलेला राडारोडा, स्वच्छता करून मुरूम टाकून रस्ता तयार करण्याचे कामकाज सुरू असल्याचे दिसून आले. वर्ष भरापूर्वी नवीन ड्रेनेज पाईपलाईन टाकण्यात आली होती. त्यावेळी नदीपत्रालगत मुरूम टाकून रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, पावसाळ्यात नदीपात्रात पाण्याची वाढ झाल्याने येथील रस्त्यावरील माती वाहून गेली. झाडे झुडपे वाढली होती. राडारोडा साठला होता. तो जेसीबीच्या साहाय्याने काढून टाकण्यात आला.

येथील नदीपात्रालगत रस्ता सुरळीत करून येत्या दोन ते तीन दिवसात गळती होत ठिकाणी दुरुस्तीचे कामकाज करण्यात येईल. यासाठी सर्व साधन सामग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे. पाईपलाईन मधून तसेच चेंबर मधून होणारी गळती त्वरित थांबविण्यासाठी प्रयत्नशील आहे. कामकाज पूर्ण झाल्यानंतर नदीमध्ये मैला तसेच सांडपाणी मिश्रित होणार नाही याची पाहणी पुन्हा करण्यात येईल. असे याप्रसंगी कनिष्ठ अभियंता राहुल पाटील यांनी सांगितले.

हे काम महापालिकेच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आले आहे. ड्रेनेज पाईपलाईन जोडण्यात आलेल्या ठिकाणी गळती होत आहे. अनेक ठिकाणाहून पावसाळ्यात माती वाहून गेली आहे. त्यामुळे जोडण्यात आलेले पाईप निखळले आहेत. काँक्रीटीकरण करून ते भक्कम करण्यात येतील. सोमवार ते मंगळवारपर्यंत कामकाज पूर्ण होईल.
                                         -राहुल पाटील,  कनिष्ठ अभियंता स्मार्ट सिटी

खरे काम होते पर्यावरण विभागाचे. मात्र, बैठकीत असे ठरले की पर्यावरणाचे काम स्मार्ट सिटीकडून करून घेण्यात यावे. त्या अंतर्गत हे काम आम्ही केलेले आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे पाईपलाईन निखळली गेली आहे. त्या ठिकाणी नाग, साप असल्यामुळे रिस्क घेतली नाही. सध्या पोकलंड, जेसीबीच्या साहाय्याने रस्त्याचे काम सुरू केले आहे.
                                                                              -चंद्रकांत मोरे,

Back to top button