पुणे : महामार्गावर ‘वडाप’ला दणका, आरटीओकडून 47 वाहनांवर दंडात्मक कारवाई | पुढारी

पुणे : महामार्गावर ‘वडाप’ला दणका, आरटीओकडून 47 वाहनांवर दंडात्मक कारवाई

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे-मुंबई जुन्या आणि नव्या महामार्गांवर अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणार्‍या 47 वाहनांवर पुणे आरटीओकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर यापैकी 5 वाहने आरटीओने जप्त केली. महामार्गांवरील अपघात रोखण्यासाठी परिवहन आयुक्त यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व आरटीओ कार्यालयांतील वायुवेग पथकांमार्फत महामार्गांवर 24 तास गस्त घालण्यात येत आहे. या वेळी मोटार वाहन कायद्याचे आणि वाहतुकीच्या नियमांचा भंग करणार्‍या वाहनांवर कडक कारवाई करण्यात येत आहे. सुरुवातीला आरटीओकडून वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यात आली. त्यानंतर आता आरटीओकडून कडक कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

यासंदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले, ’आरटीओने सोमवारपासून अवैध प्रवासी वाहतूक कारवाईला सुरुवात केली आहे. वाकड पूल, हिंजवडी, पुणे स्टेशन, द्रुतगती मार्गाजवळ काही ठिकाणे, जुन्या मार्गावरील काही ठिकाणे यांसह महामार्गांवर विविध ठिकाणी पथकांमार्फत कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी खासगी वाहनातून अवैध प्रवासी वाहतूक करत असताना खोपोलीजवळ एक अपघात झाला होता. त्यामुळे या कारवाईला सुरुवात केली आहे. येथून पुढेही ही कारवाई जोरात होणार आहे.’

सुरक्षित प्रवास करणे, आपली व प्रवाशांची सुरक्षितता राखणे हे आमचे महत्त्वाचे काम आहे तसेच, रस्त्यावरील अपघात रोखणे, गंभीर दुखापत टाळणे हासुध्दा आमच्या कामातील महत्त्वाचा भाग आहे. त्यानुसार ही कारवाई सुरू असून, यापुढेदेखील ही कारवाई कडक स्वरूपात सुरू राहील.

                    – डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे.

 

Back to top button