पुणे : नारायणगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच दिवशी तब्बल ५ ठिकाणी चोरी | पुढारी

पुणे : नारायणगावमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच दिवशी तब्बल ५ ठिकाणी चोरी

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा  : पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव पासून ७ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या १४ नंबर या ठिकाणी शुक्रवारी (दि. २३) पहाटेच्या सुमारास ५ ठिकाणी चोरट्यांनी चोरी करून एकूण ३४ हजार ८०० रुपये रोख रक्कम, अर्धा तोळ्यांचे सोन्याचे टाक व दोन चांदीच्या समया तर परमिट रूम मधून विदेशी दारूचे १३ खंबे असा मुद्देमाल चोरून नेला. या चोरीच्या घटनेत एका पतसंस्थेचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी १४ नंबर येथील अनंत ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या मागील बाजूस असणाऱ्या खिडकीचे ग्रील उचकटून आतमध्ये प्रवेश केला. तिजोरीला जोडलेल्या सायरनची वायर कट करून तिजोरीला संरक्षण म्हणून बनवण्यात आलेला लाकडी दरवाजा तोडून मुख्य तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र तिथे काही हाती न लागल्याने त्यांनी पतसंस्थेतील इतर ठिकाणी ड्रॉवर उचकटून यामधील १७ हजार ८०० रुपयांची रोख रक्कम नेली. सकाळी ९ वाजता पतसंस्थेचे कर्मचारी कांचन वाघ यांनी पतसंस्था उघडली असता त्यांच्या नजरेस ही बाब दिसून आली. त्यांनी त्वरित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ही गोष्ट सांगितली. तर जवळच अंतरावर असणाऱ्या डॉ. राजदेव यांच्या साई मेडिकलचा सेंट्रल लॉक तोडून एक हजार रुपये तर दत्तात्रय गेनूजी भोर यांच्या बंद बंगल्यातील ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे टाक व दोन चांदीच्या समया चोरून नेल्या आहेत.

दरम्यान , चोरट्यांनी रस्त्याच्या पलीकडील बाजूस हॉटेल आर्या परमिट रूम व बिअर बार फोडून तेथील रोख रक्कम रुपये १५ हजार तसेच विदेशी दारूचे १३ खंबे चोरून नेले असल्याचे हॉटेल चालक सुदेश शेट्टी यांनी सांगितले. याच हॉटेलच्या बाजूला असलेले  बालाजी जनरल स्टोअर हे दुकान फोडून तिथून एक हजार रुपये रोख व सहा सेंट बॉटल चोरून नेल्या आहेत. चोरीच्या या घटनेचे अनंत पतसंस्था, डॉ. राजदेव व हॉटेल आर्या येथील सीसी फुटेजमध्ये एकूण अंदाजे तीन चोर असल्याची शक्यता वर्तवली जात असून नारायणगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास करत आहेत

 यापूर्वीही पतसंस्थेवर पडला होता दरोडा

१४ नंबर येथील अनंत ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये २४ नोव्हेंबर २०२१ रोजी सशस्त्र चोरट्यांनी बंदुकीचा धाक दाखवून २ लाख ५० हजार रुपयाची रक्कम चोरून पोबारा केला होता. या घटनेत चोरट्याना प्रतिकार करणाऱ्या पतसंस्थेच्या व्यवस्थापकास चोरट्यांनी गोळ्या घालून ठार केले होते. त्यानंतर तब्बल १३ महिन्यांनी घडलेल्या या घटनेमुळे पतसंस्थेतील कर्मचारी हे घाबरून गेले आहेत.

Back to top button