मोठी बातमी: पुणे आरटीओने रॅपिडोचा परवान्यासाठी आलेला अर्ज नाकारला | पुढारी

मोठी बातमी: पुणे आरटीओने रॅपिडोचा परवान्यासाठी आलेला अर्ज नाकारला

पुणे, पुढारी वृत्तसेवा: रॅपिडोकडून पुणे आरटीओला अ‍ॅग्रीगेटर परवाना मिळावा यासाठी करण्यात आलेला अर्ज पुणे आरटीओकडून नाकारण्यात आला आहे. रॅपिडोची सेवा बेकायदेशीर असून प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हानीकारक असल्याचे सांगत आरटीओने हा अर्ज नाकारला आहे.

मोटार वाहन कायदा नियम 2020 नुसार मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा. लि. (रॅपिडो) यांनी दुचाकी व तिनचाकी टॅक्सीसाठी अग्रीगेटर लायसन्स मिळावे याकरिता अर्ज केला होता. हा अर्ज जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत नाकारण्यात आला आहे. मागील महिन्यात आरटीओकडून बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात शहरातील 16 रिक्षा संघटनांनी जोरदार आंदोलन केले होते. त्यासोबतच आरटीओकडून सातत्याने बेकायदा बाईक टॅक्सींवर कारवाई सुरू होती. त्यामुळे रॅपिडोने थेट उच्च न्यायालय गाठले. त्यावेळी उच्च न्यायालयाने आरटीओला मोटार वाहन कायद्यातील नियमानुसार रॅपिडोला परवाना द्यावा, असे सांगितले होते. त्यानुसार रॅपिडोकडून आरटीओला पुन्हा अर्ज करण्यात आला. या अर्जावर निर्णय घेण्यासाठी प्राधिकरणाची बैठक झाली. यात हा अर्ज नियमामध्ये बसला नाही. त्यामुळे त्या अर्जाला नाकारण्यात आले आहे.

या नियमानुसार नाकारला अर्ज…

महाराष्ट्र राज्यात शासनाने किंवा राज्य परिवहन प्राधिकरणाने बाईक टॅक्सी अशा प्रकारची कोणतीही स्कीम/योजना अद्याप राबविलेली नाही. बाईक टॅक्सी प्रकारचा परवाना/ लायसन्स जारी करण्यात आलेले नाही. तसेच, बाईक टॅक्सी बाबत ‘फेअर स्ट्रक्चरर’ धोरण अस्तितवात नाही. त्यामुळे अर्जदार मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि. (रॅपिडो) यांच्याकडून कायदेशीर बाबीची पूर्तता होत नसल्यामुळे व कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे दुचाकी टॅक्सीकरिता समुच्चयक लायसन्स देण्याचा त्यांचा अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाकडून नाकारलेला आहे.

रॅपिडोकडून करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्यामुळे तीनचाकी टॅक्सीकरिता अँग्रीगेटर लायसन्स देण्याचा अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीतील निर्णयान्वये नाकारलेला आहे. तरी याद्वारे सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपली वाहने मे. रोपन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस प्रा.लि. (रॅपीडा) यांच्या प्लॅटफॉर्मवर/अ‍ॅपवर वापरास/व्यवसायास उपलब्ध करून देऊ नयेत व नागरीकांनी रॅपीडो अ‍ॅपचा वापर करू नये. परवानाधारक वाहनांचा वापर करून आपला प्रवास सुरक्षित करावा.
– डॉ.अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा सदस्य सचिव, प्रादेशिक परिवहन प्राधिकरण

Back to top button