पुणे : पोलिस आयुक्त ॲक्शन मोडवर; अधिकार्‍यांचा रात्री उशीरापर्यंत ठाण्यात तळ | पुढारी

पुणे : पोलिस आयुक्त ॲक्शन मोडवर; अधिकार्‍यांचा रात्री उशीरापर्यंत ठाण्यात तळ

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शहर पोलिस आयुक्त म्हणून पदभार घेतल्यानंतर रितेश कुमार यांनी पहिली आठवडा बैठक (डब्लूआरएम) आज बोलावली आहे. त्यापार्श्वभूमीवर सर्व पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सहायक पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त बुधवारी रात्री उशीरापर्यंत आपल्या कार्यालयात तळ ठोकून होते. बैठकीच्या ठरविण्यात आलेल्या रुपरेषानुसार प्रत्येक मुद्याला अनुसरून माहिती एकत्र करण्यात येत होती.

ठाण्याचे प्रभारी अधिकारी आपल्याकडून बैठकीसाठी दिलेला एकही मुद्दा सुटणार नाही याची काळजी घेत होते. त्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम् यांच्या कार्यकाळातील आठवाडा बैठकीची आठवण झाल्याचे काही अधिकार्‍यांनी सांगितले. व्यंकटेशम् यांच्या आढावा बैठकीची अशीच काहीशी दहशत होती. ते कोणत्या अधिकार्‍याला ठाण्याच्या कामकाजातील कोणती माहिती कधी विचारतील याचा काही नेम नव्हता.

त्यामुळे प्रत्येक अधिकारी बैठकीच्या दोन तीन दिवस अगोदरच दप्तर तयार करून ठेवण्यास सुरूवात करत होते. आजच्या आढवा बैठकीची देखील तशाच प्रकारे माहिती मागविण्यात आल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी वेगात कामाला सुरूवात केल्याचे दिसते आहे. पदभार घेतल्यानंतर त्यांनी कोणत्याही अधिकार्‍याला वैयक्तीक न भेटता तसेच हार तुरे न स्वीकारता पुणे पोलिस आयुक्तालयाचा आढावा घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते पहिलीच आढावा बैठक आज घेत आहेत.

बैठकीत दाखल, उघड गुन्ह्यांचे विश्लेषन, उघडकीस न आलेले गंभीर गुन्हे, प्रलंबीत गुन्हे, पाहीजे फरारी आरोपी, प्रतिबंधात्मक कारवाई दोषसिद्धी, अकस्मात मयत प्रकरणे, समन्स, वॉरंट याबाबतची माहिती अद्यावत ठेवण्यात सांगण्यात आले आहे. दरम्यान गुन्हे अन्वेषन विभागात (सीआयडी) अपर पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत असताना, त्यांनी गुन्ह्यातील फरार व पाहिजे असलेल्या आरोपींबाबत पोलिस आयुक्तालये, पोलिस अधीक्षक कार्यालयांना पत्र पाठवून याबाबत मोहिम राबविण्यास देखील सांगितले होते.

विशेष म्हणजे महिलांशी संबंधीत असलेल्या अर्ज चौकशींची निर्गती, पोलिस उपायुक्त सहायक पोलिस आयुक्त यांची पोलिस ठाणे व चौकी भेट, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सहायक आयुक्त यांचे वैयक्तीक तपास, आर्थिक व सायबर प्रलंबीत गुन्हे, आगामी काळातील महत्वाचे बंदोबस्त तसेच पोलिस भरती बाबातच्या अनुषंगाने देखील सद्यपरिस्थितीत काय स्थिती असून, कोणती तयारी करण्यात आली आहे. याबाबत सविस्त माहिती मागितली आहे. त्यामुळे ही सर्व माहिती एकत्र केल्यानंतर प्रत्येक परिमंडळातील पोलिस उपायुक्तांनी तेथील सर्व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची बुधवारी रात्री उशीरा आपल्या कार्यालयात बैठक घेतल्याचे देखील समजते.

रितेश कुमारांचा असा असेल अ‍ॅक्शन प्लॅन

गुन्हेगाीर रोखण्यास प्राधान्य, कोयता वापरून गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई, स्ट्रीट क्राईमची तत्काळ दखल, उपायोजना व प्रतिबंधात्मक कारवाई,महिला व बालकांच्या संदर्भातील तक्रारींची तत्काळ दखल, एकापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची कुडंली तयार, प्रामुख्याने जबरी चोरी, चैन चोरी, घरफोडी, दरोडामधील गुन्हेगार, वाहतूक समस्येला देखील पोलिस आयुक्तांनी गांभिर्याने घेतले असून, टोईंग व्हॅनवरील कारवाई पारदर्शक, सिग्लनलवर पोलिसांची उपस्थिती राहणार.

चैन चोरी व वानहचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी प्रभावी नाकाबंदीचे आयोजन, कायदा व सुव्यवस्थेची परिस्थीती निर्माण झाल्यास ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तत्काळ घटनास्थळी भेट देऊन वरिष्ठांना माहिती देतील. अनेकदा गुन्हे दाखल करण्यासाठी ठाण्याच्या अधिकार्‍यांकडून टाळाटाळ केली जाते. त्यामुळे नागरिक आयुक्तालयाचे दार ठोठावतात. महिला, सायबर, स्ट्रीट क्राईम, चैन स्नॅचिंग, जबरी चोरी, खंडणी, सावकारी, लोन अ‍ॅप बाबतचे गुन्हे तत्काळ दाखल करण्याचे धोरण.

अमली पदार्थ विरोधी कारवाई देखील अधिक व्यापक पद्धतीने राबविण्यात येणार आहे. शाळा, महाविद्यालये, पब,बार व ऑनलाईन तस्कारांवर नजर ठेवून कडक कारवाई केली जाणार आहे. रात्रीच्यावेळी निवासी भागात रुफ टॉप हॉटेल्स व पबमुळे होणारे ध्वनीप्रदुषन व नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी पोलिस कारवाई करतील. तसेच रात्रीच्यावेळी पोलिसांची प्रभावी गस्त देखील ठेवण्यासाठी उपायोजना केल्या जाणार आहेत.

Back to top button