पिंपरी : भोसरी-चाकण निओ मेट्रो धावणार, एचसीएमटीआर मार्गामुळे नाशिक फाटा ते भोसरी भाग वगळला | पुढारी

पिंपरी : भोसरी-चाकण निओ मेट्रो धावणार, एचसीएमटीआर मार्गामुळे नाशिक फाटा ते भोसरी भाग वगळला

मिलिंद कांबळे

पिंपरी (पुणे) : औद्योगिक पट्ट्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कासारवाडीतील नाशिक फाटा ते चाकण असा 23 किलोमीटर अंतराचा मेट्रो मार्ग तयार न करता भोसरी ते चाकण, असा 15 किलोमीटर अंतराच्या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) महामेट्रो तयार करीत आहे. तो लवकरच महापालिकेस सादर केला जाईल. या मार्गावर मेट्रोऐवजी हायस्पीड टायरबेस्ड एलिव्हेटेड निओ मेट्रो धावणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या एचसीएमटीआर (हाय कॅपॅसिटी मास ट्रॉन्झीस्ट रूट-रिंगरोड) मार्गामुळे नाशिक फाटा ते भोसरी हा 8 किलोमीटर अंतर मार्ग त्यातून वगळण्यात आला आहे.शहरातील नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नाशिक फाटा ते चाकण, असा मेट्रो मार्गाचा डीपीआर तयार करण्यास महापालिकेने महामेट्रोस सांगितले होते. त्यानुसार, महामेट्रोने डीपीआर तयार करून पालिकेकडे सादर केला. मात्र, या मार्गावर प्रवासी संख्या कमी असल्याने मेट्रोऐवजी कमी खर्चातील निओ मेट्रोचा पर्याय समोर आला. त्याला पालिका प्रशासनाने मान्यता दिली. त्यानुसार सुधारित डीपीआर करण्याचा सूचना महामेट्रोस करण्यात आल्या.

पालिकेकडून शहरात एचसीएमटीआर मार्ग तयार करणार येणार आहे. हा एलिव्हेडेट (उन्नत) मार्ग आहे. नाशिक फाटा, पिंपळे गुरव, सुदर्शननगर, कोकणे चौक, काळेवाडी फाटा, तापकीर चौक, वेंगसरकर क्रिकेट अ‍ॅकॅडमी, संचेती स्कूल, बिर्ला रुग्णालय, वाल्हेकरवाडी, रानमळा हॉटेल, स्पाइन रस्ता, रेलविहार चौक, आकुर्डी रेल्वे स्थानक, निसर्ग दर्शन सोसायटी, निगडी भक्ती-शक्ती समूह शिल्प चौक, स्पाइन रस्ता, त्रिवेणीनगर, रूपीनगर, टाटा मोटर्स, जॅग्वार कंपनीसमोरून इंद्रायणीनगर, स्वामी समर्थ स्कूल, संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल, इंद्रायणी चौक, टेल्को रस्ता, सेंच्युरी एन्का, लांडेवाडी असा हा मार्ग आहे. त्या मार्गाचाही डीपीआर महामेट्रोने तयार करून पालिकेचे तत्कालिन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे सादर केला होता.

भोसरीतील लांडेवाडी ते नाशिक फाटा हा एचसीएमडीआर मार्ग असल्याने तो मार्ग नाशिक फाटा ते चाकण मेट्रो मार्गातून वगळण्यात आला आहे. त्यामुळे पालिकेने नाशिक फाटा ते लांडेवाडी मार्ग वगळून भोसरी डिस्ट्रिक्ट सेंटरपासून ते चाकण असा सुधारित डीपीआर तयार करण्यास महामेट्रोला सांगितले आहे. महामेट्रोकडून त्यावर काम सुरू असून, तो सुधारित डीपीआर लवकरच पालिकेस सादर केला जाईल.

मार्ग असणार डबलडेक

नाशिक फाटा ते चाकण हा राज्य महामार्ग असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने रस्ता रुंंदीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. स्थानिक रस्ता, महामार्ग, बीआरटीएस, मेट्रो मार्ग या मार्गाची सांगड घालण्यासाठी नागपूर मेट्रोप्रमाणे या मार्गावर डबलडेकर मार्ग बांधला जाणार आहे. हा मार्ग तब्बल बारा पदरी असणार आहे. त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिल्याचे सुत्रांनी सांगितले. यासंदर्भात ‘पुढारी’ने ‘नाशिक फाटा ते चाकण मेट्रो टप्प्यात’ असे ठळक वृत्त 24 ऑक्टोबर 2022 ला प्रसिद्ध केले होते.

महामेट्रो लवकरच सुधारित डीपीआर सादर करणार

पिंपरी-चिंचवड शहरातील एचसीएमटीआर मार्गाचा डीपीआर महामेट्रोने तयार करून पिंपरी-चिंचवड महापालिकेस पूर्वीच सादर केला आहे. भोसरी ते चाकण या मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. लवकरच तो सुधारित डीपीआर महापालिकेस सादर केला जाईल, असे महामेट्रोचे कार्यकारी संचालक पी. के. आचार्य यांनी सांगितले.

पिंपरी ते निगडीचा सुधारित प्रस्ताव दहा महिन्यांपासून केंद्राकडे पडून

पिंपरी ते निगडी मेट्रो मार्ग विस्तारीत मार्गाचा डीपीआर राज्य मंत्रिमंडळाने 27 फेब्रुवारी 2019 ला मंजूर केला. शासनाने तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविला. केंद्र शासनाने आपला हिस्साच्या निधी कमी केला. आणि सुधारित प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. त्यानुसार, सुधारित डीपीआर राज्य शासनाने 25 फेब्रुवारी 2022 ला केंद्र शासनाकडे पाठविला आहे. तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी गेल्या दहा महिन्यांपासून पडून आहे. परिणामी, पिंपरी ते निगडीपर्यंतचे काम रखडले आहे.

डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर काम सुरू होणे अपेक्षित

पिंपरी-चिंचवडच्या वाढत्या लोकसंख्येमुळे तसेच, शहर व आसपासच्या ग्रामीण भागात वाढणार्‍या औद्योगिकीकरणामुळे भविष्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रश्न अधिक जटिल होऊ शकतो. त्यावर उपाय म्हणून आतापासूनच शहरात मेट्रोचे जाळे निर्माण करण्याची गरज आहे. पिंपरी ते फुगेवाडी मेट्रो सुरू झाली आहे. पुढील महिन्यात पिंपरी ते पुण्यातील सिव्हील कोर्ट स्टेशनपर्यंत मेट्रो धावणार आहे. नाशिक फाटा ते चाकण मार्गाच्या डीपीआरचे काम सुरू असून, त्या मार्गावर तसेच, एचसीएमटीआर मार्गावर निओ मेट्रो धावणार आहे. राज्य व केंद्र सरकारची मंजुरीनंतर काम सुरू होईल. परिणामी, संपूर्ण शहर मेट्रोने जोडले जाणार आहे, असा विश्वास आमदार लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो मार्गाबाबत महामेट्रोने आ. जगताप यांना पत्र पाठवून सविस्तर माहिती दिली आहे.

…अशी आहे निओ मेट्रो

भारतातील दुसर्‍या किंवा तिसर्‍या श्रेणीतील शहरात गर्दीच्या वेळी तासाला साधारणपणे 5 ते 15 हजार लोक प्रवास करतात. ही प्रवासी संख्या वाहून नेण्याची क्षमता असणारी निओ मेट्रो सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपाय आहे. या मेट्रो निओचे कोचेस, सोयीसुविधा, स्टेशन व इतर सगळे मेट्रोसारखेच असेल. फक्त निओ मेट्रोचे कोचेस इतर मेट्रोप्रमाणे रुळांवर न चालता रबरी टायरवर चालणार आहेत. मेट्रो निओ विजेवर धावणारी तरीही रबरी टायरची चाके असणारी आहे. निओ मेट्रोच्या एका कोचमध्ये सुमारे 180 ते 250 प्रवासी बसू शकतात. निओ मेट्रो एकावेळी तीन कोचेससह धावते. मेट्रो प्रकल्पासाठी येणार्‍या खर्चापेक्षा मेट्रो निओचा खर्च कमी असल्याने त्याला प्राधान्य दिले जात आहे. निओ मेट्रोची रचना बससारखी आहे.

Back to top button