पिंपरी : काळेभिंत परिसरात रस्तेच नाही ! जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी | पुढारी

पिंपरी : काळेभिंत परिसरात रस्तेच नाही ! जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनी लक्ष देण्याची मागणी

अंगद राठोडकर  : 

भोसरी : पिंपरी चिंचवड पालिका स्थापनेनंतर पालिकेत उशिराने समाविष्ट झालेल्या चर्‍होली परिसरातील रस्त्यांचा अगदी वेगाने विकास होत असला तरी, याच चर्‍होलीतील काळेभिंत परिसरात मात्र रस्ते नसल्यामुळे या परिसरातील नागरिकांची फजिता होत आहे.
दोनशे ते अडीचशे घरांची लोकवस्ती असलेल्या या भागाकडे जाण्यासाठी रस्ताच नाही, वस्तीत आले तर घराकडे जाण्यासाठी धड रस्ते नाहीत, रस्त्यात काळाकुट्ट अंधार, त्यातच पुन्हा असलेल्या पायवाटेसारख्या रस्त्यात आडवे तिडवे पसरलेले दगड गोटे, रस्त्यावरून चालताना बाजूने काटेरी झाडे, झुडुपे यातून वाट काढत ये-जा करावी लागते. सर्वत्र सांडपाणी पसरल्याने परिसरात नेहमीच घाणीचे साम्राज्य असल्याचे दिसून येते. स्थानिक पातळीवर रस्त्यासाठी शेतकरी तयार होत नाहीत. तर, दुसरीकडे पालिका प्रशासन या भागाकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हाधिकारी आणि पालिका आयुक्तांनीच पुढाकार घेऊन या भागाला न्याय द्यावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत .

पालिका अधिकार्‍यांचा हलगर्जीपणा

काळेभिंत परिसराकडे जाण्यासाठी वास्तविक गुरुकृपा मंगल कार्यालयाच्या शेजारी असलेल्या नाल्यातून आजपर्यंत या भागातील नागरिकांनी रस्ता म्हणून याचा वापर केला, जो की आजही चालूच आहे. पावसाळ्यात धो धो वाहणारा हाच नाला पालिकेच्या मंजूर विकास आराखड्यातून गायब असला तरी प्रत्यक्ष जागेवर हा नाला उपलब्ध आहे. याच नाल्याच्या कडेला मंजूर विकास आराखड्यात 24 मीटरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. येथे नाला आहे की नाही, हेच तपासण्यासाठी व तो असेल तर जागां बदलायची कशी, याच मुद्द्यावर पालिकेच्या नगर रचना विभागाने तब्बल 25 वर्षांचा कालावधी पूर्ण केला. पालिकेच्या नगररचना विभागाने पालिका हद्दीत अनेक ठिकाणी असाच गोंधळ घातला असून प्रत्यक्ष जागेवर न जाता विकास आराखडा तयार केला गेल्याने परिसरातील शेतकरी आणि नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते.

पुणे-आळंदी मुख्य रस्त्याच्या मधून वाहणार्‍या नाल्यावर पूल बांधून तो रस्ता पूर्ण करण्यात आला. मग हा रस्ता सुद्धा असाच पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. मात्र, अद्यापही पालिका या भागातील नागरिकांसाठी रस्ता करून देण्याबाबत योग्य त्या निर्णयावर पोहचू शकली नाही. हा नाला बुजवून रस्ता करणे शक्य नाही, परंतु नाल्यावरून पूल बांधून रस्ता देणे पालिकेला शक्य असल्याचे मत व्यक्त केले जात आह्रे. वास्तविक हा रस्ता नाल्याच्या अगदीच लगत असून इ प्रभाग स्थापत्य विभाग हा रस्ता करण्यासाठी इच्छुक असला तरी येथील काही शेतकरी आपली जागा देत नाहीत त्यामुळे रस्ता करण्यासाठी अडथळा निर्माण होत असल्याची माहिती स्थापत्य विभागाने दिली.

काही शेतकर्‍यांचा विरोध

बहुतांशी शेतकर्‍यांची या रस्त्यासाठी संमती आहे. तर काही शेतकरी त्यासाठी विरोध करीत आहेत, त्यामुळे वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. सुरुवातीला ग्राम पंचायत असताना केवळ 10 ते 12 घरांचा उंबरठा असलेल्या चर्‍होलीतील काळे भिंत परिसर आज जवळपास एक हजारापेक्षा जास्त लोकसंख्येचा भाग झाला आहे. पाहता पाहता वस्तीचे रुपांतर दत्त नगर (काळे भिंत) म्हणून नावारूपाला आले. या वस्तीकडे हा रस्ता गेल्या 25 वर्षांपासून विकास आराखड्यातच अडकून पडलेला दिसून येतो.

मुलांची शाळेसाठी कसरत
या भागातील नागरिक व लहान शाळकरी मुलाना पावसाळ्यात शाळेत जाताना कमालीची कसरत करावी लागते. दोन्ही बाजूंनी हिरवी गर्द काटेरी झाडी झुडपे यातून वात काढत शेतकरी, मजूर, कामगार व शाळकरी मुलांना या बिकट रस्त्यातून पायी प्रवास करावा लागतो.

पर्यायी रस्त्याचे काम अर्धवटच
दुसरा पर्यायी रस्ता तयार केल्याचे पालिका अधिकारी सांगत असले तरी हा रस्ता नागरिकांना सोयीचा वाटत नसल्याने नागरिक याच ओढ्यातून चालणे पसंद करतात. हा पर्यायी रस्ता नागरिकाना गैरसोयीचा वाटत असला तरी तोही अद्याप अपूर्णच आहे. ज्या भागात बांधकाम व्यावसायिकांनी बांधकाम केले तेवढ्याच भागात डांबरी रस्ता तयार करून देण्यात आला आहे. त्यानंतर पुढे ते काम तसेच अर्धवट अवस्थेत पडून आहे.

 

काळेभिंत परिसरात सध्या कोणत्याही बिल्डरांच्या जागेवर बांधकाम सुरू नाही. शिवाय हा रस्ता केल्याने कोणत्याही अधिकार्‍याचा फायदा होणार नसल्याने या रस्त्याकडे अधिकारी फारसे लक्ष देत नाहीत.
-राजाराम तापकीर,  स्थानिक रहिवासी

पालिका नेहमीच नागरिकांना सुविधा देण्यात कुठे कमी पडत नाही, हा रस्ता विकसीत करण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले, अनेक वेळा शेतकर्‍यांनी आम्हाला अपमानित करुन परत पाठवले. तरीही आम्ही हा रस्ता पूर्ण करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. फक्त शेतकर्‍यांनी समजून घेत आपापली जागा देण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलावे व अ आणी ब प्रपत्र भरुन देऊन सहकार्य करावे, काम लगेच सुरू होईल.
-शिवराज वाडकर, उपअभियंता,  स्थापत्य विभाग, ई प्रभाग, भोसरी

Back to top button