राजगुरुनगर : कांद्यावर करप्यासह किडींचा प्रादुर्भाव | पुढारी

राजगुरुनगर : कांद्यावर करप्यासह किडींचा प्रादुर्भाव

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा : ढगाळ वातावरणामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्याने खेड तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. याशिवाय गेल्या दोन दिवसातील अशा वातावरणामुळे रब्बी हंगामातील बटाटा, ज्वारी, गहू आणि भाजीपाला, तरकारी पिकांवर सुद्धा किडीचा प्रादुर्भाव होणार आहे. औषध फवारणीसाठी नाहक खर्च करावा लागणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत. कांदा खरेदी विक्रीचे राज्यस्तरीय केंद्र असलेला चाकण बाजार असल्याने खेड तालुक्यात रब्बी हंगामात कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जवळपास 10 हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकरी कांदा पिकवतात.

खरीप हंगामाच्या अखेरीस कांदा रोप तयार केले जाते. त्यानंतर शेताची मशागत, बांधणी, लागवड अशा खर्चिक कामात शेतकरी कर्जबाजारी होतात. चार ते पाच महिने पाणी सिंचनाचा खर्च होतो. अशातच वातावरण बदलाला सामोरे जाताना औषध फवारणी करावी लागते. एकंदर नगदी म्हणजे चांगले उत्पादन झाल्यास शेतकर्‍यांना वर्षभराची कमाई होते.

पण, पाच महिन्यांच्या काळात ढगाळ वातावरण, धुके किंवा पाऊस पडल्यास कांद्यावर करपा रोग, कीड वाढते. अशा वातावरणात कांद्याच्या पातीचे नुकसान होऊन त्याचा परिणाम उत्पादन क्षमतेवर होतो. अपेक्षित उत्पादन होत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात ओढला जातो.

अतिवृष्टी, वादळ झाल्यास शासन नुकसानभरपाई देते. मात्र ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाल्यास कोणत्याही भरपाईची तरतूद नाही. खेडमधील अनेक शेतकरी वर्षानुवर्षे नुकसानीत येत आहेत. पाण्याच्या मुबलकतेमुळे कांद्यासह रब्बीत बागायती पिके घेतली जातात. बाजारपेठ तालुक्यात आहे, पण निसर्गापुढे शेतकरी हतबल झाल्याचे चित्र आहे.

साखर कारखाना हवा
निसर्गाच्या लहरीपणामुळे पीकपद्धती बदलण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत. याचाच एक भाग म्हणून तालुक्यातील विविध भागात ऊस लागवड केली जाते. मात्र, तालुक्याला स्वतःचा साखर कारखाना नाही. ऊस तोडणीसाठी शेतकर्‍यांना वेठीस धरले जाते. तोंड पाहून किंवा आर्थिक तडजोडीने ऊसतोडीला प्राधान्य दिले जाते. तालुक्यातील अनेक ऊस उत्पादक शेतकर्‍यांना अशा प्रकारच्या त्रासाने छळले आहे. वर्ष, दीड वर्ष जोपासना करून ऊस वेळेत ना तोडल्याने वजनात घट होते. त्यातील तोटाच वाट्याला येतो. म्हणून तालुक्यातील बरेचसे शेतकरी कांदा, बटाटा पिकाला प्राधान्य देतात.

Back to top button