नारायणगाव : पहाटेपासूनच रांगा; चित्रपट कलावंतांचाही कार्यक्रमात सहभाग | पुढारी

नारायणगाव : पहाटेपासूनच रांगा; चित्रपट कलावंतांचाही कार्यक्रमात सहभाग

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : श्रीक्षेत्र ओझर या ठिकाणी श्री विघ्नहराच्या दर्शनासाठी भल्या पहाटेपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. पहाटे चार ते रात्री अकरापर्यंत सुमारे दीड लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पहाटे 4 वाजता श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, सचिव दशरथ मांडे, विश्वस्त राजश्री कवडे यांच्या हस्ते श्रींना महाअभिषेक पूजा करून दर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले. मंदिरामध्ये चतुर्थीनिमित्त महाआरती करण्यात आली. महाआरतीचा मान गणेशभक्त डॉ. कैलास बावसकर, गणेशभक्त विजय जाधव, दीपक लोंढे, गणेश टाव्हरे, उद्योजक बाळासाहेब शहाणे यांना मिळाला.

डिसेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी व रविवारच्या योगाने भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. सकाळी 7.30 वा. महाआरती व दुपारी 12.00 वा. माध्यान्ह आरती करण्यात आली. सकाळी 8.00 वा. नियमित पोथी वाचन करण्यात आले. सकाळी 10.30 वा.”श्री” स नैवेद्य दाखवून भाविकांना खिचडी वाटप श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली.

भाविकांसाठी मंदिरात दर्शनरांग, शुद्ध पिण्याचे पाणी, अभिषेक व्यवस्था, देणगी कक्ष, अभिषेक करण्यासाठी शमी वृक्षाखाली व्यवस्था, दर्शन झाल्यानंतर विसाव्यासाठी विघ्नहर उद्यान, चप्पल स्टँड, पार्किंग, कमीत कमी वेळेतील दर्शनासाठी मुखदर्शन व्यवस्था इत्यादी व्यवस्था करण्यात आली. अन्नदान महाप्रसाद योजनेमध्ये सुमारे 2500 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे व विश्वस्त मंडळाने केलेल्या संकल्पानुसार कुकडी नदीतीरावर गंगाआरती झाली.

याच वेळी मंदिरात 7.00 वा नियमित हरिपाठ करण्यात आला. धूपारती, तसेच चंद्रोदयापर्यंत कीर्तनकार ह.भ.प. अर्चना नेवकर, नेवकर यांचे हरिकीर्तन झाले. त्यांना साथसंगत राम प्रसादिक भजनी मंडळ शिरोली यांनी दिली. संभाजी दत्तात्रय बोडके यांनी अन्नदान केले. संकष्टी चतुर्थीचे वारकरी अन्नदान गणपत दगडू बोडके यांनी केले. रात्री 10.30 वाजता धूपारती करून 11.00 वाजता मंदिर बंद करण्यात आले.

महाआरतीच्या मानकर्‍यांनी देवस्थान ट्रस्टच्या विकास कामात सहभागी होऊन ट्रस्टला देणगी दिली. संकष्टी चतुर्थीनिमित्त झी टॉकीज प्रस्तूत गजर महाराष्ट्राचे प्रोड्युसर गणेश कदम, धाव मराठी चित्रपटाचे दिग्दर्शक भरत सुनंदा व कलाकार, पशुसंवर्धन अधिकारी धनंजय परकाळे, डॉ. कैलास बावीस्कर यांनी देवस्थान ट्रस्टच्या मोफत दवाखान्यास भेट देऊन त्याठिकाणी शासकीय ओपीडी सुरू करण्याचे जाहीर केले. भाविकांचे स्वागत देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश कवडे, उपाध्यक्ष अजित कवडे, सचिव दशरथ मांडे, खजिनदार कैलास घेगडे आदींनी केले. गर्दीचे नियोजन देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक व कर्मचारी यांनी केले.

Back to top button