सणसवाडी : पुढारी वृत्तसेवा : सेफ्टीक टँकमध्ये पडून तरुणाचा मृत्यू झाला. कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील आनंदनगरमधील स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये शनिवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. शुभम ईश्वर आचार्य (वय २३ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) असे सेफ्टीक टँकमध्ये पडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तिघा जणांना अतिदक्षता विभागात दाखल केले आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून अनेक नागरिक हळहळ व्यक्त करत आहे.
कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील आनंद नगर मधील स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये शिरीष देशमुख यांच्या घराच्या सेफ्टीक टँकची साफसफाई करत हाेते.
अचानक एक कर्मचारी टँकमध्ये पडला.
यावेळी त्याला वाचविण्यासाठी इतर कर्मचारी टँकमध्ये पडले.
यावेळी शेजारील नागरिकांनी आरडाओरडा केली.
नागरिक या ठिकाणी मदतीसाठी धावून आले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, पोलीस नाईक संतोष पवार, होमगार्ड गणेश भंडारे यांसह आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यावेळी परिसरातील नागरिकांनी घडलेल्या घटनेनंतर मोठ्या प्रमाणात गर्दी केली.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या अग्निशमन पथकाला घटनास्थळी बोलाविण्यात आले.
अग्निशमन दलाचे ऑफिसर विजय महाजन, नितीन माने, महेश पाटील, ओमकार पाटील, तेजस डोंगरे, उमेश फाळके, प्रशांत अडसूळ, अक्षय बागल यांनी मदतकार्य सुरू केले.
चौघांना टाकीच्या बाहेर काढण्यात आले.
टाकीमध्ये पडलेल्या दशरथ देवराम गव्हाणे, विकी नंदू दरेकर, धरमसिंग परदेशी व शुभम ईश्वर आचार्य यांना टाकीतून बाहेर काढत उपचारासाठी वाघोली येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.
या दुर्घटनेमध्ये शुभम ईश्वर आचार्य (वय २३ वर्षे रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) याचा मृत्यू झाला.
दशरथ देवराम गव्हाणे (वय ४० वर्षे), विकी नंदू दरेकर (वय २४ वर्षे), धरमसिंग परदेशी (वय ३५ वर्षे सर्व रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हेही वाचलं का?