माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग परदेशात पसार? | पुढारी

माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग परदेशात पसार?

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग सध्या चौकशी आयोगासमोर हजर राहत नाहीत, शिवाय ते चंदीगढ आणि मुंबईतील निवासस्थानीही नसल्याने ते कुठे पसार झाले, असा सवाल आता पोलिसांनाही पडला आहे. ते परदेशात पसार झाले आहेत मात्र, भारतातून ते परदेशात गेले नसल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी १०० कोटींच्या कथित पैसे वसुलीचा आरोप केला.

त्यानंतर चांदीवाल न्यायिक आयोगाने मुंबईच्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात जामीनपात्र वारंट जारी केले आहे.

हे वॉरंट बजावण्यासाठी चंदिगढमध्ये गेलेल्या सीआयडीला परमबीर सिंग सापडले नाहीत.

त्यामुळे परमबीर सिंग हे नेमके कुठे आहेत, असा सवाल उपस्थित झाला आहे.

परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती कैलाश चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एका आयोगाची स्थापना केली आहे.

आयोगाने वारंवार समन्स बजावून परमबीर सिंग हे चौकशीला हजर राहिले नाहीत.

आयोगाने त्यांना तीन वेळा दंडही ठोठावला. सिंग यांनी ही रक्कमही जमा केली आहे. मात्र ते चौकशीला हजर राहिले नाहीत.

परमबीर सिंग हे वेळोवेळी गैरहजर राहात असल्यामुळे सुनावणी पुढे ढकलण्याची वेळ येत असल्याने आयोगाने अखेर जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे.

५० हजारांचा बॉण्ड

आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना वॉरंट जारी करण्यासाठी उच्च स्तरीय अधिकार्‍याची नेमणूक करण्याचे निर्देश दिले आहेत.

तसेच वॉरंट अमलात आणताना ५० हजार रुपयांचे बॉण्ड सादर करण्यास सांगितले आहेत.

त्यानुसार सीआयडीचे पथक वॉरंट बजावण्यासाठी परमबीर सिंग यांच्या मुंबईतील मलबार हिल येथील घरी पोहोचले.

मात्र परमबीर सिंग तेथे सापडले नाही. अखेर सीआयडीचे पथक चंदीगढमध्ये दाखल झाले. येथील घरीही परमबीर सिंग त्यांना भेटले नाहीत. त्यामुळे परमबीर सिंग कुठे पसार झाले हे समजत नाही.

त्यामुळे सीआयडीचे पथक आणखी काही दिवस चंदीगढमध्ये थांबणार असल्याचे समजते.

ईडीसह सीआयडी, एसीबी ठाणे पोलीस परमबीर सिंग यांचा जबाब नोंदविण्यासाठी शोध घेत आहेत.

परमबीर सिंग विदेशात गेल्याची नोंद आढळली नसल्याची माहिती मिळते. दरम्यान, चांदीवाल आयोगाची पुढील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार आहे.

हेही वाचा 

Back to top button