ग्रीनहाऊस वायूंमुळे बदलू शकतात अटलांटिकवरील वारे | पुढारी

ग्रीनहाऊस वायूंमुळे बदलू शकतात अटलांटिकवरील वारे

अ‍ॅरिझोना : कार्बन डायऑक्साईडसारख्या ग्रीनहाऊस गॅसेसच्या उत्सर्जनामुळे पर्यावरणावर विपरित परिणाम होत आहे. एका नव्या संशोधनात आढळले आहे की अटलांटिक महासागरावरील ‘जेट स्ट्रीम’ही गेल्या 1250 वर्षांच्या काळात बदललेली आहे. जर ग्रीनहाऊस गॅसेसचे उत्सर्जन असेच सुरू राहिले तर 2060 पर्यंत ‘जेट स्ट्रीम’ची स्थिती नैसर्गिक ‘रेंज’च्या बाहेर येईल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. त्याचे परिणाम अटलांटिकच्या दोन्ही बाजूंना पाहायला मिळतील.

अ‍ॅरिझोना युनिव्हर्सिटीच्या क्लायमेट सिस्टीम्स सेंटरमधील मॅथ्यू ऑस्मन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी याबाबतचे संशोधन केले आहे. ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेज’ मध्ये त्याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. उत्तर अटलांटिक ‘जेट स्ट्रीम’ आर्क्टिक प्रदेशाला वळसा घालणार्‍या पश्चिमी वार्‍यांचा एक प्रवाह आहे. तिला ‘पोलर जेट’ असेही म्हटले जाते. अतिशय उंचीवरून चालणार्‍या या वार्‍यांचा प्रभाव उत्तर अमेरिका आणि पश्चिम युरोपमधील हवामान व वातावरणावर पडतो. दोन्ही ठिकाणी होणार्‍या पाऊस आणि तापमानावर या वार्‍यांचा दहा ते 50 टक्के प्रभाव असतो. जेट स्ट्रीममधील बदलाचा परिणाम ओल्या किंवा सुक्या दुष्काळातून दिसू शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे.

Back to top button