सातारा : पार कुमठे गावच्या हद्दीत ब्‍लॅक पँथर चे दर्शन, स्‍थानिकात घबराट | पुढारी

सातारा : पार कुमठे गावच्या हद्दीत ब्‍लॅक पँथर चे दर्शन, स्‍थानिकात घबराट

सातारा (प्रतापगड) ; पुढारी वृत्तसेवा : घनदाट सदाहरित जंगलांनी वेढलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील कुमठे या गावी दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ब्लॅक पँथर चे दर्शन स्थानिक गुराख्याना झाले. ब्‍लॅक पँथरचे दर्शन झाल्‍याने स्‍थानिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुमठे गावाच्या हद्दीत असलेल्या सुभाष नारायण जाधव यांच्या मालकीच्या शेतामध्ये शुक्रवारी सकाळी शेतामध्ये रवींद्र जाधव, सुभाष जाधव हे दोन युवक गाई चारण्यासाठी घेऊन गेले होते.

त्यांना तेथे ब्लॅक पँथर दिसला. या ब्लॅक पँथरचा वावर हाच दिवसभर परिसरात चर्चेचा विषय झाला आहे. शेत गावापासून १५ मिनिटांच्या अंतरावर ब्‍लॅक पँथरचे दर्शन झाल्‍याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कुमठे हे गाव महाबळेश्वर कोयना खोऱ्यात अतिदुर्गम भागात वसले आहे. हा सर्व परिसर गर्द झाडी जंगल यांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या परिसरात नेहमीच जंगली प्राण्यांचा वावर असतो. मात्र दुर्मिळ ब्लॅक पँथर दिसल्याचा दावा स्थानिक युवकांनी केल्याने एकच खळबळ माजली आहे.

सदर घटनेचा व्हिडीओ रविंद्र मनोहर जाधव यांनी अतिशय धाडसाने आपल्या मोबाईलद्वारे काढला असून, तो माहितीस्तव प्रसिध्द केला आहे.

सदर व्हिडीओमध्ये ब्लॅक पँथर स्पष्ट दिसत आहे. वनखात्याने याबाबत तपास करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

तर प्रथमच हा ब्लॅक पँथर महाबळेश्वरच्या रूपाने महाराष्ट्रात दिसला असून नामशेष होत असलेली प्रजाती पुन्हा दिसल्याने वन्य प्राणी प्रेमींसाठी ही आनंदाची बाब आहे. स्थानिकांमध्ये मात्र घबराटीचे वातावरण आहे.

Back to top button