पुणे : तरुण पिढी पाहतेय रोजचे हवामान; विविध अ‍ॅप पाहणार्‍यांची संख्या वाढली | पुढारी

पुणे : तरुण पिढी पाहतेय रोजचे हवामान; विविध अ‍ॅप पाहणार्‍यांची संख्या वाढली

आशिष देशमुख

पुणे : सध्याचे हवामान अत्यंत लहरी स्वरूपाचे झाले आहे. पूर्वी अ‍ॅप नसल्याने मोबाईलवर हवामानाचे फारसे अपडेट कळत नव्हते; मात्र गेल्या तीन वर्षांत हवामान विभागाने अनेक हवामानविषयक अ‍ॅप तयार केल्याने त्याचा अंदाज घेण्यासाठी तरुण पिढी हे अ‍ॅप सतत वापरत आहे. या साइटसह विविध अ‍ॅप पाहणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

पुणे शहरात हवामान विभागाची वेधशाळा फार जुनी आहे. पूर्वी लोकांना माहिती व्हावी म्हणून वेधशाळेसमोर डिजिटल बोर्ड होता; आता मात्र मोबाईलवरच विविध हवामानाचे अ‍ॅप तयार झाल्याने लोकांना हवामान लवकर कळणे शक्य झाले आहे. खास करून तरुण पिढी हे अ‍ॅप मोठ्या प्रमाणावर वापरत आहे.

‘मौसम’ अ‍ॅपचे रेटिंग सर्वाधिक
पुणे वेधशाळा देशातील प्रमुख हवामान केंद्रांपैकी एक आहे. या ठिकाणाहूनच देशभरातील वेधशाळांत अनेक शास्त्रज्ञ प्रशिक्षण घेऊन जातात. वेधशाळेने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाइन आकडेवारीनुसार हवामानाचे विविध अ‍ॅप वापरणार्‍यांची नोंद साइटवर होते. त्या आकडेवारीनुसार दररोज 330 जण हे अ‍ॅप उघडून पाहतात. यात ‘मौसम’, ‘मेघदूत’, ‘उमंग’, ‘दामिनी’, ‘लायटिंग’ असे अ‍ॅप आहेत. यात पावसाचा अंदाज, किमाल व किमान तापमान, आर्द्रता, वार्‍यांचा वेग आदी माहिती मिळते. यात ‘मौसम’ अ‍ॅपचे रेटिंग सर्वाधिक असून, 3.9 इतके रेटिंग त्याला मिळाले आहे.

वर्षाला लाखापेक्षा जास्त लोक पाहतात अ‍ॅप…
हवामान हा आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनल्याने सामान्य नागरिकांपासून शेतकर्‍यांपर्यंत सर्वजण हवामानाचे अ‍ॅप पाहू लागले आहेत. पुणे वेधशाळेच्या आकडेवारीनुसार दिवसाला 330 शहरांत अ‍ॅप पाहतात, तर महिनाभरात अडीच हजार, तर वर्षाला 1 लाख 63 हजार नागरिकांनी हवामानाचे अ‍ॅप वापरल्याची नोंद आहे.

हवामान पाहून ठरवला जातो ट्रिपचा बेत…
मोबाईलवर दिसणारे हे अ‍ॅप वापरून आजचे तापमान, पाऊस पडेल का, थंडी कुठे जास्त आहे, याचा अंदाज बांंधता येतो. तरुण पिढी याचा पुरेपूर वापर करताना दिसत आहे. 9 डिसेंबर रोजी अचानक तापमानात बदल झाला. वाढलेल्या किमान तापमानात घट झाली. 9 रोजी राज्यात औरंगाबाद शहराचे किमान तापमान 7.9 अंश इतके खाली आले. हा बदल केवळ या अ‍ॅपमुळे नागरिकांना मोबाईलवर कळतो आहे.

बंद पडलेले जुने घड्याळ दुरुस्त केले…
पुणे शहरात शिवाजीनगर भागात हवामान विभागाची फार जुनी इमारत आहे. हे कार्यालय सिमला येथून पुण्यात इंग्रज अधिकार्‍यांनी हलविले. शंभर वर्षांचा इतिहास या इमारतीला आहे. त्यात टॉवरवर मोठे घड्याळ आहे. ते गेल्या साडेतीन महिन्यांपासून बंद होते. ते अखेर सुरू करण्यात तेथील टीमला यश मिळाले. 9 डिसेंबरपासून या जुन्या इतिहासकालीन घड्याळाची टिकटिक सुरू झाली आहे.

Back to top button