कार्ला : विविध समस्यांसाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात | पुढारी

कार्ला : विविध समस्यांसाठी नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात

कार्ला : पुढारी वृत्तसेवा :  रेल्वे आणि बसेसविषयीच्या प्रवाशांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, यासह इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी कार्ला परिसरातील नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. एकवीरा कृती समितीने रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले असून, याबाबत लवकर निर्णय न घेतल्यास मंगळवार, दि. 13 डिसेंबरपासून बेमुदत आंदोलनाचा इशारा समितीने दिला आहे.
लोणावळा पुणे (इ.एम.यु.) लोकलसेवा पूर्ववत होण्याबाबत कामशेत गेट नं. 42 गलथान कारभाराबाबत, मळवली गेट नं. 36 तासनतास बंद असल्याने अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच, जांभूळ गे. नं . 47 भुयारी मार्ग, तसेच संभाव्य मळवली रेल्वे उड्डाण पूल चालू करताना कराव्या लागणार्‍या पर्यायी वाहतूक व्यवस्थेबाबतीत चर्चा करण्यासाठी तसेच पीएमआरडीए प्रारूप आराखडा व इंद्रायणी नदीपात्र खोल करण्याबाबत, या व अशा अनेक मागण्यांबाबत एकवीरा कृती समितीने रेल्वे मंत्री, खासदार व रेल्वे प्रशासनाला निवेदन दिले आहे. या मागण्यांबाबत 10 डिसेंबरपर्यंत बैठकीसाठी बोलवले नाही, तर रेल्वे प्रशासनाविरुद्ध मळवली स्टेशन येथे बेमुदत उपोषणाचा इशारा कार्ला एकवीरा कृती समितीने दिला आहे. मळवली येथील संपर्क बालग्राम येथे एकवीरा कृती समितीने परिसरातील नागरिक एकत्र येत बैठक घेण्यात आली.

या बैठकीमध्ये सर्वांनुमते मागण्या मान्य न झाल्यास मंगळवारी, 13 डिसेंबरला बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.
लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशनचे नवनियुक्त पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी एकवीरा कृती समितीचे भरत मोरे, दीपक हुलावळे, बाळासाहेब भानुसघरे, नंदकुमार पदमुले, किरण हुलावळे, गुलाब तिकोणे, अमितकुमार बॅनर्जी व परिसरातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, शेतकरीबांधव उपस्थित होते.

सुविधांसाठी पीएमपीला निवेदन

तसेच, या बैठकीमध्ये पीएमपीएमएल सेवा पूर्वीप्रमाणे सुरू करण्यात आल्याबद्दल पालकमंत्र्याचे देखील विशेष अभिनंदन करत आभार व्यक्त केले. तसेच शहरी भागात सुखसुविधा दिल्या जातात त्याचप्रमाणे ग्रामीण भागाला देण्यात याव्यात. याबाबत लवकरच पीएमपीएमएल प्रशासनाला निवेदन देण्यात
येणार आहे.

Back to top button