पिंपरी : गोळीबारानंतर पोलिस आयुक्तांची ’फायरिंग’ | पुढारी

पिंपरी : गोळीबारानंतर पोलिस आयुक्तांची ’फायरिंग’

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी येथील गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बुधवारी (दि. 7) तातडीने प्रभारी अधिकार्‍यांची बैठक घेतली. यामध्ये सर्व अधिकार्‍यांना धारेवर धरत आगामी काळात सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. या बैठकीला आयुक्तालयातील सर्व ठाण्यांसह गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठ उपस्थित होते. याबाबत सविस्तर वृत्त असे की, मंगळवारी सायंकाळी पिंपरी परिसरात तीन ठिकाणी गोळीबाराची घटना घडली. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

या घटनेची गंभीर दखल घेत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे हे स्वतः घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आरोपी ताब्यात घेईपर्यंत ते स्वतः चिंचवड पोलिस ठाण्यात बसून होते. दरम्यान, घटनेच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी दुपारी हद्दीतील सर्व प्रभारी अधिकार्‍यांची शिंदे यांनी बैठक बोलावली. या बैठकीमध्ये प्रभारी अधिकार्‍यांना त्यांनी चांगलेच खडे बोल सुनावल्याची सूत्रांची माहिती आहे.

सहायक आयुक्तही जबाबदार

हद्दीत घडणार्‍या गंभीर गुन्ह्यांना चौकीचे अधिकारी, ठाण्यांचे प्रभारी अधिकार्‍यांसह संबंधित विभागाचे सहायक आयुक्तदेखील तितकेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनीदेखील बारकाईने लक्ष द्यावे, असे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बैठकीत सांगितले.

अलर्ट रहा… नाहीतर उचलबांगडी

आगामी काळात हद्दीतील गुन्हेगारांची इतंभूत माहिती प्रभारी अधिकार्‍यांसह चौकी अधिकार्‍यांकडे असणे बंधनकारक असणार आहे. तसेच, यापुढे ज्याच्या हद्दीत गोळीबारासारखी गंभीर घटना घडेल तेथील जबाबदार असलेल्या अधिकार्‍यांना नियंत्रण कक्ष अथवा तत्सम ठिकाणी संलग्न करण्यात येणार असल्याचा इशारा अंकुश शिंदे यांनी दिला. त्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे अधिकार्‍यांचे धाबे दणाणल्याचे चित्र आहे.

अवैध धंदे बंदच ठेवा

हद्दीतील अवैध धंदे बंद करण्याबाबत अंकुश शिंदे यांनी यापूर्वी सूचना केल्या आहेत. मात्र, तरीदेखील काही हद्दीत लपून छपून अवैध धंदे सुरू असल्याचे कुणकुण आयुक्त अंकुश शिंदे यांच्या कानावर आहे. त्यामुळे प्रभारी अधिकार्‍यांच्या बैठकीत त्यांनी अवैध धंदे पूर्णपणे बंदच राहतील, असे आदेश दिले. तसेच, प्रतिबंधक कारवाया वाढवून हद्दीतील गुन्हेगारी संपवा, असेदेखील शिंदे यांनी अधिकार्‍यांना सांगितले.

Back to top button