‘पुरंदर विमानतळ भूसंपादनाची अधिसूचना पंधरा दिवसांत’ | पुढारी

‘पुरंदर विमानतळ भूसंपादनाची अधिसूचना पंधरा दिवसांत’

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यासाठी नियोजित पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ बारामतीमध्ये करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव होता. मात्र, तो केंद्र सरकारने उधळून लावला. त्यामुळे पुरंदरमधील पूर्वीच्याच सात गावांमध्येच विमानतळ प्रकल्प होणार आहे. या ठिकाणच्या जागेसाठी सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त झाल्या असून, पुढील 15 दिवसांत विमानतळच्या भूसंपादनाची अधिसूचना निघेल, अशी माहिती माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

विमानतळ प्रकल्प बारामतीला करण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरविले होते. मात्र, नव्या जागेला केंद्राकडून नकार देण्यात आला आहे. पुरंदर तालुक्यातील सात गावांत यापूर्वी निश्चित केलेल्या जागेतच प्रकल्प होणार असून, सर्व प्रकारच्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून भूसंपादन करण्यात येणार आहे. त्याबाबतची अधिसूचना 15 दिवसांत निघेल,’ असे शिवतारे यांनी सांगितले.

पुरंदर विमानतळासाठी निश्चित केलेल्या सात गावांपासून पुढे विमानतळाचे टर्मिनल सुपे येथे करण्याचा घाट राष्ट्रवादीने घातला होता. मात्र, केंद्राने त्याला नकार कळवला आहे. नागरिकांनी प्रकल्पाला जमीन देण्यासाठी जी तत्परता दाखवायला पाहिजे होती, ती दाखवली नाही. त्यामुळे एमआयडीसीच्या माध्यमातून विमानतळासाठी जमीन संपादन करण्यात येईल. याबाबतची अधिसूचना 15 दिवसांत काढण्यात येईल, असेही शिवतारे यांनी स्पष्ट केले.

Back to top button