माझगावातून तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता | पुढारी

माझगावातून तरुणी संशयास्पदरीत्या बेपत्ता

नसरापूर : सैन्यामध्ये जाण्याचे ध्येय उराशी  बाळगणारी तरुणी राहत्या घरातून मध्यरात्री संशया-स्पदरीत्या बेपत्ता होण्याची घटना घडली आहे. गेल्या 15 दिवसांपासून तिचा शोध पोलिसांना लागत नसल्याने नातेवाईक चिंतातुर झाले आहेत. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात खबर दाखल केली आहे. ऋतुजा सुरेखा पडवळ (वय 19, माझगाव, ता. भोर) असे बेपत्ता तरुणीचे नाव आहे. 21 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ती बेपत्ता झाली. उंची पाच फूट सात इंच, रंगाने गोरी, सडपातळ, अंगात राखाडी रंगाचे जरकीन, नाईट पँट अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास राजगड पोलिस स्टेशन 02113/272233 व 9822060189 या क्रमांकावर संपर्क साधावा.

मुलीच्या आईला दि. 21 नोव्हेंबरला मध्यरात्री दीड वाजता जाग आली असता ऋतुजा घरात आढळून आली नाही. तिच्या पायातील चप्पल व इतर सर्व वस्तू जैसे थे घरात आहे. यामुळे नातेवाईक व गावातील ग्रामस्थांनी परिसरात शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. अखेर आई सुरेखा पडवळ यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी गांभीर्याने घेणे गरजेचे

ऋतुजाच्या आईच्या म्हणण्यानुसार, ती ध्येयनिष्ठ असून ती मैत्रिणीप्रमाणे आईला प्रत्येक बाब विश्वासाने सांगायची. बेपत्ता झाल्यानंतर कात्रजमध्ये एकाने तिला भेदरलेल्या अवस्थेत पाहिले असल्याचे कळाले. त्यामुळे पोलिसांनीही घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तपास करणे गरजेचे आहे.

Back to top button