पिंपरी : पीएमआरडीए आयुक्तांचा प्रशासनावर नाही वचक | पुढारी

पिंपरी : पीएमआरडीए आयुक्तांचा प्रशासनावर नाही वचक

नंदकुमार सातुर्डेकर

पिंपरी : राज्यात सत्ता बदल होताच अनेक प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त सुहास दिवसे यांची बदली करण्यात आली. त्यांच्या जागी राहुल महिवाल यांची नियुक्ती करण्यात आली. पीएमआरडीएच्या नव्या आयुक्तांपुढे हा गाडा पुढे नीट हाकण्याचे विशेषत: विकास आराखडा अंतिम करणे, मेट्रो, रिंगरोड प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान आहे; मात्र आयुक्तांचा प्रशासनावर वचक नसल्याने ही कामे मार्गी कशी लागणार, हा प्रश्नच आहे.

महाविकास आघाडी सरकारने पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलिनीकरण पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए)मध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पीएमआरडीएचे महत्त्व वाढले. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासात पीएमआरडीएचे महत्त्व असणार आहे, हे जाणून पीएमआरडीएच्या आयुक्तपदी सुहास दिवसे यांची नियुक्ती करण्यात आली होती. विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे विश्वासू अशी त्यांची ओळख होती; मात्र राज्यात सत्तांतर होताच त्यांची बदली करण्यात आली. त्या जागी राहुल महिवाल यांची नियुक्ती केली.

पीएमआरडीएचे आयुक्त म्हणून महिवाल यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. दिवसे यांनी पीएमआरडीएचे आयुक्त म्हणून पावणेदोन वर्षात अनेक कामे केली. जीआयएस प्रणालीवर आधारित पीएमआरडीएचा आराखडा प्रसिद्ध केला. हरकती व सूचनांची सुनावणी करून तो अंतिम टप्प्यापर्यंत आणला. सप्टेंबअखेर सुनावणी होऊन तज्ञ समिती शासनास अभिप्राय कळवेल व डिसेंबर-जानेवारीत अंतिम आराखडा अपेक्षित मानला जात होता; मात्र विकास आराखडा वेळेत अंतिम करण्याच्या दृष्टीने पावले दिसत नाहीत.

विकास आराखड्यातील आरक्षणे विकसित करावी लागतील. ग्रामस्थांचा विरोध मवाळ करत, विश्वासात घेऊन विकासकामे मार्गे लावावी लागतील. अंतिम आराखडा न झाल्याने प्लॉट एन. ए. करणे यासारखी जमिनीविषयक कामे करणे जिकिरीचे झाले आहे. डीपी नसल्याने आरक्षण कळत नाही.

पीएमआरडीएसाठी रिंगरोड, विमानतळ, मेट्रो प्रकल्प हे महत्त्वाचे प्रकल्प आहेत. ते मार्गी लावण्याच्या दृष्टीने पावले टाकावी लागतील. हे नवीन आयुक्तांनी प्रशासनावर वचक ठेवल्याशिवाय होणार नाही. दिवसे यांच्या कारकिर्दीत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम मार्गी लागले. या प्रकल्पासाठी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांच्या मदतीने 99 टक्के भूसंपादन करून घेतले. भविष्यात भूसंपादनाबाबत त्यांचा हा आदर्श पुढे नेण्याबाबत उदासीनता दिसत आहे.

रिंगरोडचे काम कागदावरच आहे. पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलिनीकरण पीएमआरडीएमध्ये झाले प्राधिकरणाने जे गृहप्रकल्प उभारले ते वाटपाचे काम पीएमआरडीएकडे आले; मात्र सदनिकांच्या किमती जास्त असल्याने तीनदा मुदतवाढ देऊनही नागरिकांचा त्यास प्रतिसाद नाही. हे लक्षात घेऊन प्राधिकरणाने सुवर्णमध्य काढणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही.

ठेकेदारांच्या जीवावर कामे
पीएमआरडीएच्या वतीने जी कामे चालू आहेत, ती ठेकेदारांच्या जीवावर चालू आहेत. त्यांच्यावर पीएमआरडीएचा वचक नाही. डेटा खासगी संस्थांच्या हातात जात आहे. उद्या त्यातून काही झाल्यास पीएमआरडीएलाच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे राहावे लागणार आहे.

उदंड झाल्या घोषणा
पीएमआरडीएच्या वतीने हायपर लूक रेल्वे, मेडिसिटी प्रकल्प यासारख्या अनेक प्रकल्पांच्या घोषणा झाल्या मात्र त्यांची अद्यापही अंमलबजावणी होत नसल्याने हे प्रकल्प कागदावरच आहेत.

पीएमआरडीएचे महानगर आयुक्त राहुल महिवाल गुजरात निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून गेले असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. उपजिल्हाधिकारी तथा जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप म्हणाले की, पीएमआरडीएच्या विकास आराखड्यावर आलेल्या 69 हजार हरकती 20 ऑक्टोबरपूर्वी म्हणजे विक्रमी वेळेत संपवल्या आहेत. त्यामुळे विकास आराखड्याबाबत विलंबाचा आरोप करणे चुकीचे आहे. रिंगरोड एमएसआरटीसी करणार आहे. काही ठिकाणी म्हणजे सोलू ते वडगाव शिंदे सारख्या ठिकाणी पीएमआरडीए करणार आहे.

Back to top button