सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर; बारावीच्या 80, तर अकरावीच्या 20 टक्के अभ्यासक्रमाला महत्त्व | पुढारी

सीईटीचा अभ्यासक्रम जाहीर; बारावीच्या 80, तर अकरावीच्या 20 टक्के अभ्यासक्रमाला महत्त्व

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात इंजिनिअरिंग, फार्मसी, एमबीए, एमसीए, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी, अ‍ॅग्रिकल्चरसह विविध पदवी आणि पदव्युत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी सेलकडून साधारण 17 सीईटी परीक्षा घेण्यात येतात. त्यासाठीच्या सीईटींचा अभ्यासक्रम सीईटी सेलने जाहीर केला आहे.

सीईटी 2023 परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये संबंधित विषयांची यादी देखील देण्यात आली आहे. अधिसूचनेनुसार एमएचटी सीईटी प्रश्नपत्रिकेमध्ये बारावीच्या अभ्यासक्रमाला 80 टक्के महत्त्व आणि अकरावीच्या अभ्यासक्रमाला 20 टक्के महत्त्व दिले जाणार आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने गेल्या वर्षी बारावीच्या अभ्यासक्रमातून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयांचा काही भाग वगळला होता. 2023 मध्ये होणारी सीईटी संपूर्ण अभ्यासक्रमावर आहे. सीईटी सेलच्या वेबसाईटवर अभ्यासक्रम तसेच गुण कसे दिले जाणार, याविषयीची सविस्तर माहिती दिली आहे.

गुणदान पद्धत जाहीर…
सीईटी सेलने एमएचटी सीईटी 2023 ची गुणदान पध्दत देखील जाहीर केली आहे. एमएचटी सीईटी परीक्षा 2023 ही कॉम्प्युटर बेस्ड एमसीक्यू पध्दतीने होणार असून, यामध्ये निगेटिव्ह मार्कगिं राहणार नाही. एमएचटी सीईटी परीक्षा प्रश्नपत्रिकेची काठिण्य पातळी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासाठी जेईई मेन्सच्या बरोबरीची असेल आणि जीवशास्त्राची काठिण्य पातळी ’नीट’ परीक्षेच्या बरोबरीची असेल.

‘वन नेशन वन एक्झाम’ धोरणाला केराची टोपली
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणार्‍या ’एमएचटी सीईटी’सोबतच विविध सीईटी परीक्षांचा अभ्यासक्रम प्रसिद्ध केला आहे. या सीईटींचा अभ्यासक्रम जाहीर केल्यामुळे यंदाही सीईटींची संख्या कमी होणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’एक देश एक परीक्षा’ (वन नेशन वन एक्झाम) या धोरणाला राज्यात पुन्हा एकदा केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

Back to top button