टाकळी हाजी : कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी | पुढारी

टाकळी हाजी : कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी

टाकळी हाजी; पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍यांनी साठवण करून ठेवलेला जुना कांदा अजून वखारीमध्ये असतानाच नवीन कांद्याच्या लागवडी सुरू झाल्या आहेत. त्याचवेळी कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. थंडीच्या प्रमाणात वाढ होत असताना शेतकर्‍यांना मात्र दिवसभर पाण्यात राहून लागवड करावी लागत आहे. या परिस्थितीत पहिलाच कांदा वखारीत शिल्लक असताना नवीन कांद्याची लागवड करणे म्हणजे हिवाळ्यातील गारठ्यापेक्षा मनाने शेतकरीवर्ग गारठला असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात मोठ्या प्रमाणात बागायती क्षेत्र आहे. या भागातील बहुतांश शेतकरी कांदा पीक मोठ्या प्रमाणात घेतात. शिवाय दिवाळीनंतर कांद्याच्या लागवडी सुरू होतात. त्यामुळे उन्हाळ्यात काढलेला कांदा साठवणूक करण्यावर या शेतकर्‍यांचा भर असतो. दरवर्षी दिवाळीच्या सुमारास बाजारभाव चांगला मिळतो म्हणून या काळात वखारी फोडल्या जातात. मात्र या वर्षी पावसाळा संपला तरी अवकाळी पाऊस पडत राहिल्यामुळे तसेच बाजारभावदेखील वाढले नाहीत. त्यामुळे या भागातील शेतकर्‍यांनी दर वाढण्याची वाट बघत वखारी फोडल्या नाहीत.

व्यापार्‍यांनीदेखील साठवला कांदा
कांदा उत्पादक शेतकर्‍यांबरोबरच काही व्यापार्‍यांनीसुद्धा कांदा साठवणूक केलेली आहे. मोठमोठे गोडाऊनसारखे वखारींचे शेड उभारले आहेत. त्यासाठी जागा उपलब्ध करण्यापासून शेड उभारणीसाठी नाना प्रकारे सायास करून गुंतवणूक केलेली आहे. मात्र आता कांदा खराब होण्यास सुरुवात होऊनही अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने गुंतवणूकदेखील वसूल होणे अवघड झाल्याचे चित्र या परिसरात दिसून येत आहे.

Back to top button