पुणे : अपरिचित साहित्यकारांना प्रसिद्धी मिळणे गरजेचे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी | पुढारी

पुणे : अपरिचित साहित्यकारांना प्रसिद्धी मिळणे गरजेचे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दर्जेदार साहित्यनिर्मिती करूनही समाजाला अपरिचित असलेल्या साहित्यकारांना ’लिटररी फेस्टिव्हल’च्या माध्यमातून प्रसिद्धी मिळणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी व्यक्त केली. यशदा येथील सभागृहात विश्वकर्मा पब्लिकेशन्स आयोजित ’10 व्या इंटरनॅशनल लिटररी फेस्टिव्हल – 2022’चे (पीआयएलएफ) उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या लेखिका सुधा मूर्ती, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे भरत अगरवाल, लेखक डॉ. विक्रम संपथ आदी उपस्थित होते.

कोश्यारी म्हणाले, ’सर्व वयोगटातील मुले, व्यक्ती भेटायला येतात तेव्हा पुस्तके भेट देतात. अनेक अज्ञात लेखक, कवी लेखन करीत असतात. ते जरी स्वत:च्या समाधानासाठी लिहीत असले तरी ते साहित्य केव्हातरी वाचले जाईल, अशी आशा त्यांना असते. त्यासाठी आपल्यामध्ये वाचन प्रेरणा (रीडिंग स्पिरिट) कायम असली पाहिजे, जी अशा महोत्सवांच्या आयोजनातून वाढीस लागते.’

राज्यपाल म्हणाले, ’संवादातून, चर्चासत्रातून आपल्याला वेगवेगळे विचार समजतात आणि त्यातून समाजातील वास्तवाविषयी माहिती मिळते. प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वत:चे विचार असतात. वेगवेगळ्या विचारसरणीच्या लोकांना आपले विचार व्यक्त करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले पाहिजे. या फेस्टिव्हलमुळे अशाच प्रकारे विविध विचारांच्या व्यक्ती एकत्र येत विश्वबंधुत्वाची भावना वाढीस लागेल.’

Back to top button