पुणे : एचआयव्हीग्रस्तांच्या जुळल्या रेशीमगाठी | पुढारी

पुणे : एचआयव्हीग्रस्तांच्या जुळल्या रेशीमगाठी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : एचआयव्हीग्रस्त असलेल्या प्रणीता (नाव बदलले आहे) हिचे लग्न जुळत नव्हते. त्यामुळे ती हताश झाली होती. परंतु, काही वर्षांनी तिच्या आयुष्यात प्रेमाचे आणि रेशीमगाठीचे बंध जुळले अन् तिने लग्न करून संसार थाटला. एचआयव्हीग्रस्त व्यक्ती लग्न करू शकत नाही किंवा जगू शकत नाही, ही समाजाची मानसिकता आहे. पण, आता एचआयव्हीग्रस्त व्यक्तींच्या रेशीमगाठी पुन्हा जुळू लागल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात नव्याने प्रेम फुलू लागले आहे. त्यांच्या जगण्यात एक सकारात्मक पालवी फुलते आहे.

ही पालवी फुलविण्याचे काम केले आहे दीपगृह सोसायटीच्या दिशा प्रकल्पाने. एचआयव्हीग्रस्त महिला आणि पुरुषांना साथ मिळावी आणि त्यांचे लग्न व्हावे, यासाठी संस्था काम करीत आहे. त्यासाठी घेण्यात येणार्‍या मोफत वधू-वर मेळाव्यातून गेल्या काही वर्षांत एचआयव्हीग्रस्त अशा 200 जोडप्यांचे नाते जुळले आहे. गुरुवारी असलेल्या जागतिक एड्स दिनानिमित्त ’पुढारी’ ने त्यांच्या या कामाचा आढावा घेतला.

संस्थेच्या माया प्रेम म्हणाल्या, की 2005 मध्ये दिशा प्रकल्पाची सुरुवात झाली. आत्तापर्यंत वधू-वर परिचय मेळाव्यातून सुमारे 200 जोडप्यांचे विवाह यशस्वीपणे जुळविण्यात आले आहेत. या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळतो. कोरोनामुळे काही काळ हा उपक्रम थांबला होता. परंतु, त्या उपक्रमाची पुन्हा सुरुवात झाली आहे. संस्थेच्या अध्यक्षा अश्लेषा ओनावळे, लता माने, वैशाली साळवे आणि सहकारी त्यासाठी मेहनत घेत आहेत.

18 डिसेंबरला ताडीवाला रस्त्यावरील संस्थेच्या कार्यालयात मेळावा होईल. वर्षभरात आम्ही असे मोफत वधू-वर परिचय मेळावे आयोजित करतो. एचआयव्हीग्रस्त लोकांना जोडीदार मिळावा आणि त्यांच्या आयुष्याला आधार मिळावा, यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यांच्या समुपदेशनापासून ते कायदेशीर मदतीपर्यंंतचे सहकार्य आम्ही करतो. त्यामुळे अनेकांना जोडीदार मिळाले आहेत आणि ते सुखी-आत्मविश्वासाने आयुष्य जगत आहेत.

तरुण-तरुणींचेही लग्न
एचआयव्हीग्रस्त असणार्‍या 18 वर्षांपुढील तरुण-तरुणींचे लग्न या माध्यमातून झाले आहे. समाजात आपल्याला नाकारले जाते आणि त्यामुळे आपले लग्न कसे होईल, हा विचार पूर्वी त्यांच्या मनात यायचा, पण आता हा विचार बाजूला सारून ते लग्न करायला पुढाकार घेत आहेत. दिशा प्रकल्पामुळे समाजात एचआयव्ही एड्सबद्दलची मानसिकता बदलते आहे. या व्यक्ती आताही सामान्य आयुष्य जगत आहेत. त्यांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आयुष्याचे जोडीदार मिळाले आहेत. हा प्रकल्प अविरतपणे सुरू असल्याचे माया प्रेम यांनी सांगितले.

Back to top button