जुन्नरच्या 70 टपरीधारकांना नोटीस | पुढारी

जुन्नरच्या 70 टपरीधारकांना नोटीस

जुन्नर; पुढारी वृत्तसेवा : पाडळी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीने गायरान जमिनीवरील अतिक्रमणे निष्कासित करण्याकरिता जुन्नर येथील 70 अनधिकृत टपरीधारकांना नोटीस दिल्या आहेत. यामध्ये 2 डिसेंबरपर्यंत ही अतिक्रमणे स्वत:च्या खर्चाने निष्कासित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पाडळी बारवच्या ग्रामसेविका सुरेखा कुदळ, सरपंच संतोष केदारी यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने अनधिकृत टपरीधारकांना अतिक्रमणाबाबत या नोटीस बजाविल्या आहेत.

जिल्हाधिकारी यांनी गायरानावरील अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यानुसार पाडळी ग्रामपंचायत हद्दीतील गायरान जमिनीवरील बेकायदेशीररीत्या अतिक्रमण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर येत्या 10 दिवसांत स्वतःच्या खर्चाने अतिक्रमणे काढावी लागणार आहेत. ही सर्व अतिक्रमणे दिलेल्या मुदतीत स्वतःच्या खर्चाने न काढल्यास त्यानंतर शासकीय यंत्रणेद्वारे ती काढण्यात येणार असून, अतिक्रमणास कारणीभूत धरून शासकीय नियमांप्रमाणे अतिक्रमण काढण्याकरिता झालेला खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निश्चित कालमर्यादेमध्ये कारवाई करणे बंधनकारक असल्याचे टपरीधारकांना दिलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, जुन्नरमधील 70 अनधिकृत टपरीधारकांना या नोटिसा मिळाल्या असून, गेल्या अनेक वर्षांपासून या टपर्‍यांमध्ये विविध व्यवसाय करणार्‍या गरीब, गरजू व ज्यांचे संसार या व्यवसायावर अवलंबून आहेत अशांमध्ये खळबळ उडाली असून, हे सर्वजण मानसिक तणावाखाली आहेत.

Back to top button